भविष्यातील संघर्ष टाळण्यासाठी पाणी बचत करा, दक्षिण सोलापुरातील मुळेगावात ‘जलशक्ती अभियाना’चा प्रारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाणी हे जीवन आहे. यामुळे पाण्याची बचत आणि काटकसर महत्त्वाची आहे. भविष्यातील पाण्याचा संघर्ष टाळण्यासाठी पाणी बचत करा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी केले.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव येथे ‘जलशक्ती अभियाना’ची सुरुवात जलशपथ घेऊन करण्यात आली. याप्रसंगी जाधव बोलत होते. यावेळी रोहयोच्या उपजिल्हाधिकारी चारुशिला देशमुख, जिल्हा जलसंधारण अधिकारी अण्णासाहेब कदम, तहसीलदार अमोल कुंभार, उपअभियंता अडते, क्षीरसागर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

जाधव म्हणाले, घराच्या छतावरील पाणी वाया घालविण्याऐवजी ते पाणी जमिनीमध्ये जिरविणे गरजेचे आहे. ही कामे रोजगार हमीतून करता येणार आहेत. प्रत्येक नागरिकाने पाण्याची बचत करण्याचा प्रयत्न करावा. पृथ्वीवरील जीवसृष्टीचा समतोल राखायला हवा. जलसंधारणाच्या उपाययोजना करणे काळाची गरज आहे. जिल्हा परिषदेमध्येही ‘जलशक्ती अभियाना’ची शपथ घेण्यात आली. जलसंधारण कार्यालयातही शपथ घेण्यात आली.

मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ‘जलशक्ती अभियाना’चा आढावा घेऊन सूचना दिल्या होत्या. ‘जलशक्ती अभियाना’ची सुरुवात प्रत्येक गावातून होण्यासाठी ग्रामपंचायतीने शक्य झाल्यास विशेष ग्रामसभा आयोजित करावी किंवा त्यांच्याकडील नियमानुसार 1 एप्रिल ते 7 एप्रिल 2022 या दरम्यान ग्रामसभा आयोजित करावी. ग्रामसभेची सुरुवात जलशपथ घेऊन करावी आणि सभेमध्ये गावाच्या पाण्याची गरज, उपलब्ध साधने यावर चर्चा करून आवश्यक उपाययोजनांसाठी गावाचा जल आराखडा तयार करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या.

30 सप्टेंबर 22 पर्यंत हा कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे. त्याअंतर्गत ग्रामसभा एक ते सात एप्रिलपर्यंत घेण्यात येणार आहे. जलशक्ती केंद्र उघडून त्यामार्फत जनजागृती करणे, गावाचा कृती आराखडा तयार करणे, सर्व पाण्याच्या स्रोतांचे जिओ टॅगिंग करून रेकॉर्डवर नोंदणी करण्याविषयीच्या सूचना जिल्हाधिकाऱयांना दिल्या आहेत. जलशक्ती अभियान हे जनआंदोलन करण्यासाठी प्रयत्न करावेत. सर्व विभागांच्या समन्वयातून गावांमध्ये कामे करावीत. जिल्हास्तरीय समितीचे जिल्हाधिकारी अध्यक्ष आणि जिल्हा जलसंधारण अधिकारी सदस्य सचिव असणार आहेत.