
एस.एम.पाटील । परळी वैद्यनाथ
तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेच्या कामात केलेल्या अनियमितता, बोगस नोंदी व अपहार करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी हे कामे करणार्या १३८ संस्थांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या पुर्वीच कृषी विभागाच्या २४ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.कृषी अधिकाऱ्यानंतर आता या काम केलेल्या संस्थांवर कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
वर्ष २०१५ – २०१७ दरम्यान तालुक्यातील विविध गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेचे काम मोठया प्रमाणात झालेले होते.यातील एकुण ३०७ कामे परळी तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमत करून कामे केली होती.यावरच दक्षता पथक कृषी आयुक्तालय पुणे यांनी केलेल्या चौकशीत दोषी असलेल्या एकुण २४ अधिकारी व कर्मचारी यांच्यावर याआधीच कारवाई करत ८ मार्च रोजी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. या नंतर आता हे सर्व काम करणाऱ्या संस्थांवर कारवाई चा बडगा उचलण्यात आला असून या प्रकरणाच्या चौकशीत दक्षता पथक कृषी आयुक्तालय पुणे यांनी आहवाल दिला आहे.
या नुसार परळी तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेचे काम करणाऱ्या संस्थांवर ठपका ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या १३८ संस्थांनी या कामात अनियमितता करणे, मापन पुस्तिकेत बोगस नोंदी करणे, व प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा असे निर्देश दिले आहेत.
या आधारावरच परळी शहर पोलीस ठाण्यात तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांनी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी आरोपी संस्थाविरुद्ध कलम ४२०,४०९ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक डी. के. शेळके हे करीत आहेत.
































































