जेम्स बॉण्डच्या चित्रपटाचा प्रीमियरच 100 कोटींचा

हॉलिवूडमधील जेम्स बॉण्ड सीरिजच्या सिनेमांचे जगभरात चाहते आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यात ‘नो टाइम टू डाय’ हा जेम्स बॉण्ड सीरिजचा सिनेमा येतोय. त्याकडे अवघ्या बॉण्डप्रेमींचे लक्ष लागलंय. लंडनमध्ये ‘नो टाइम टू डाय’चा भव्यदिव्य प्रीमियर होणार असून निर्मात्यांनी फक्त प्रीमियरसाठी 100 कोटींचे बजेट ठेवलंय. पडद्यामागे काम करणाऱया कलावंतांसाठी वेंबले एरिना स्टेडियमध्ये खास प्रीमियर शो होणार असल्याचे समजते.

कोरोना महामारीमुळे ‘नो टाइम टू डाय’चे प्रदर्शन चार वेळा पुढे ढकलण्यात आले आहे. हिंदुस्थान, चीनसह अनेक देशांमध्ये प्रमोशनल टूरदेखील रद्द करण्यात आल्या. जेम्स बॉण्डच्या भूमिकेत डेनियल क्रेगचा हा अखेरचा सिनेमा आहे. यानंतर नवीन जेम्स बॉण्ड येणार आहे.

बॉण्डपट म्हटला की स्टाईल, ऍक्शन, गॅजेट्स सारंच अफलातून असतं. म्हणून जगभरातील बॉण्डचे चाहते अगदी आतुरतेने या सिनेमांची वाट बघत असतात. ‘नो टाइम टू डाय’ हा सिनेमा एप्रिल 2020 पासून तयार आहे. त्याचा दुसरा ट्रेलर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आला होता. त्यातील रोमांचक दृश्ये बघून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

प्रेक्षकांमुळे ओटीटीला नकार

‘नो टाइम टू डाय’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मववर प्रदर्शित करू नये, अशी जगभरातील बॉण्डप्रेमींची मागणी होती. त्याचा विचार करून निर्मात्यांनी हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित केलेला नाही. जेम्स बॉण्ड सीरिजच्या याआधीच्या ‘स्पेक्टर’ सिनेमाने 800 कोटींची कमाई केलेली आहे. नवा बॉण्डपटदेखील कमाईचा विक्रम मोडेल, असा अंदाज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या