जामखेड तालुक्यात लिंबाची 50 लाखांची रोज उलाढाल, दर टिकून असल्याने शेतकऱयांमध्ये समाधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळ्यात लिंबाचे दर शंभरीपार झाले असून, हे दर गेल्या एक महिन्यापासून टिकून आहेत. त्यामुळे लिंबाचे आगार समजल्या जाणाऱया जामखेड तालुक्यातील पिंपरखेड, हाळगाव, अरणगाव व फक्राबाद या गावांमध्ये दैनंदिन 50 लाख रुपयांहून अधिक उलाढाल होत आहे. महाराष्ट्रात उष्णता वाढली की, लिंबू महागते हा आजपर्यंतचा अनुभव आहे. मात्र, यावर्षी प्रथमच लिंबाचे दर टिकून आहेत. आज लिंबाला 100 ते 150 रुपये किलोपर्यंतचा दर मिळत असल्याने शेतकऱयांमधून समाधान व्यक्त होत आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णता वाढली आहे. उन्हाच्या काहिलीपासून वाचण्यासाठी नागरिकांचा ओढा लिंबू पाणी, सरबत पिण्याकडे वाढला आहे. यामुळे राज्यात लिंबाची मागणी वाढली आहे. लिंबू उत्पादकांचे आगार अशी ओळख असलेल्या जामखेड तालुक्यातील हळगाव, पिंपरखेड, अरणगाव, फक्राबाद भागातील लिंबू राज्यासह देशभरात वेगवेगळ्या भागात विक्रीस नेला जात आहे. प्रामुख्याने दिल्ली, जयपूर या भागात हे लिंबू विक्रीला पाठवले जात आहेत. उत्पादित होणाऱया लिंबाची खरेदी गावागावातल्या स्थानिक व्यापाऱयांकडून केली जात आहे. वेगवेगळ्या स्थानिक आडत्यांच्या माध्यमांतून लिंबाची खरेदी होत आहे.

लिंबाचे भाव कडाडल्यामुळे लिंबू उत्पादक शेतकरी आपल्या कुटुंबीयांसमवेत लिंबाच्या तोडणीसाठी रणरणत्या उन्हात बागांमध्ये काम करताना दिसत आहेत. सध्या लिंबाला काही ठिकाणी 100 रुपये, तर काही ठिकाणी 150 रुपये दर मिळत आहे. परंतु, किरकोळ बाजारात हेच लिंबू अधिक भावाने विकले जात आहे. एक लिंबू 5-10 रुपयांपेक्षा अधिक भावाने शहरात विकले जात आहे. चांगला बाजारभाव मिळत असल्याने लिंबू उत्पादक शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे. लिंबाला येत्या काही दिवसांत अधिक भाव मिळेल, अशी आशा शेतकऱयांना आहे.