जामखेड शहरातील बाजारात दिवसा ढवळ्या गोळीबार

899

जामखेड शहरातील बीड रोडवर जुन्या वादातून आठवडी बाजारादिवशीच सकाळी भरदिवसा एकाने हवेत गोळीबार केला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं असून तपास सुरू केला आहे.

जामखेड शहरात २९ रोजी आठवडी बाजारादिवशीच एका कापड दुकानासमोर जुन्या वादातून हा गोळीबार झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पंधरा दिवसांपूर्वी संबंधित आरोपीचे आणि समोरील गटाचे वाद निर्माण झाला होता. हा वाद शनिवार २९ रोजी आठवडी बाजारादिवशीच पुन्हा उफाळून आला. हवेत गोळीबार झाला असल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील हे त्यांच्या पथकासह गोळीबार झाला त्या ठिकाणी पोहोचले. या वेळी बघ्याची एकच गर्दी जमली होती.

गोळीबार झालेला सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून त्या आधारे पोलीस तपास करीत आहेत. अद्याप या प्रकरणी पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही. गोळीबारामुळे परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याची चर्चा नागरिकांमधून सुरू आहे. जामखेड शहरात गोळीबाराच्या वारंवार घटना घडत आहेत.

2018 मध्ये जामखेड शहरात भरदिवसा दोन वेळा गोळीबार झाला होता. 29 एप्रिल 2018 रोजी शनिवारी गोळीबार होऊन दुहेरी हत्याकांड घडले होते. या घटनेला दोन वर्षे होण्याच्या आतच परत गोळीबार झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या