जामखेडमधील बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह विहिरीत सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कालपासून बेपत्ता असलेल्या तालुक्यातील फक्राबाद येथील बालकाचा मृतदेह घराजवळच विहिरीत आढळला आहे. या मुलीचा तोल जाऊन पाण्यात पडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. तोच अंदाज खरा ठरल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संग्राम संतोष भोसले (वय 6) असे मृताचे नाव आहे.

संग्राम हा मुलगा काल घरासमोर खेळत आसताना अचानक बेपत्ता झाला होता. याबाबत मुलगा हरवल्याचा मेसेज व फोटो सोशल मीडियावर फिरत होता. याबाबत पोलीस पाटील योगीनाथ जायभाय यांनी सदरची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना दिली होती. काल दिवसभर संग्राम आढळून न आल्याने आज सकाळी घराजवळील कठडे नसलेल्या विहिरीतील पाण्यावर रज्जाक शेख यांना चपला तरंगताना आढळून आल्या. यानंतर संग्राम विहिरीत पडल्याचे लक्षात आले.

विहिरीत दोन मोटारी लावून पाणी उपसण्यात आले. त्यानंतर दोरीच्या साहाय्याने संग्रामचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.