नगर : अंधश्रद्धेतून पुतण्याने केली दत्त देवस्थानच्या प्रमुखांची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जामखेड

तुझे आजोबा करणी करत होते हे सगळीकडे सांगितल्याने आपली बदनामी झाली आहे असे वाटून अंधश्रध्देतून पुतण्यानेच दत्त मंदिराचे प्रमुख कुशाबा शिकारे (50) यांची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना जामखेड मधील खर्डा जवळील शिकारे वस्ती येथे घडली. ही हत्या त्यांच्याच चुलत पुतण्याने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मयताची पत्नी रेखा शिकारे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. या प्रकरणी आरोपी शंकर सोपान शिकारे विरूद्ध भादवी 302 नुसार जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिकारे वस्ती येथे घराजवळच बांधण्यात आलेल्या दत्त मंदिरात कुशाबा शिकारे पुजारी म्हणून काम पहात होते. त्यांना गायन, भजन व कीर्तनाचीदेखील आवड होती. शनिवारी रात्री शिकारे महाराज हे फराळ करून एकादशी निमित्त भजनाच्या तयारीसाठी दत्त मंदिरात गेले होते. मंदिरात प्रवेश करताच अज्ञात इसमाने त्यांच्या तोंडावर व गळ्यावर धारदार शस्त्राने पाच ते सहा वार केले आणि अंधाराचा फायदा घेत मंदिराच्या मागच्या बाजूने पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले शिकारे महाराज यांना मुलाने व गावातील व्यक्तींनी जामखेड ग्रामीण रुग्णालयत दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

हत्या झाल्यानंतर नुतन पोलीस अधीक्षक इशू सिंधु, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अरूण जगताप रात्रीपासूनच तळ ठोकून होते. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी चार तपास पथके तैनात केले होते. श्वान पथकही तैनात करण्यात आले होते. श्वान पथकाच्या मदतीने पोलीसांनी आरोपी शंकर सोपान शिकारे याच्या घराचा माग काढला तेथे पोलीस पोहचले तेव्हा आरोपी स्वतःच्या डाव्या हाताची नस कापून रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्यास सकाळी ताब्यात घेऊन जामखेड येथील ग्रामीण रूग्णालयात नंतर नगर व आता पुणे येथील ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत.