जामखेडमध्ये पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू

298

जामखेड तालुक्यातील शिऊर फाटा व तेलंगशी या दोन वेगवेगळ्या घटनेत पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटने प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बाळु उर्फ प्रकाश श्रावण तुपे रा. बीड व प्रणीता गंगाधर ढाळे रा. तेलंगशी अशी दोन्ही पाण्यात बुडालेल्या मयतांची नावे आहेत.

पहिल्या घटनेत मयत बाळु उर्फ प्रकाश श्रावण तुपे (30) रा. बीड हा एक महिन्यांपासुन शिऊर फाटा येथील एका हॉटेल मध्ये वेटरचे काम करत होता. मात्र  7 डिसेंबर पासुन तो बेपत्ता होता. यानंतर चार दिवसांनी म्हणजे 11 डिसेंबर रोजी त्याचा मृतदेह शिऊर फाटा येथील हॉटेलच्या मागील विहीरी मध्ये पाण्यावर तरंगताना अढळुन आला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण व पोलीस नाईक अजय साठे यांनी भेट दिली व शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयत दाखल केला. पोलिसांनी घटनेची माहिती त्याच्या आई वडीलांना दिल्या नंतर त्याचे नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले.

मयत बाळु उर्फ प्रकाश श्रावण तुपे हा एक महीन्यांपुर्वी घरात भांडणे झाली असल्याने तो जामखेड येथील एका हॉटेलात वेटरचे काम करण्यासाठी आला होता. त्याच्या मृत्यू प्रकरणी नातेवाईकांना संशय व्यक्त केला. यामुळे पोलिसांनी त्याचा व्हीसेरा राखुन ठेवला असुन तपासणीसाठी तो पुढे पाठवण्यात येणार आहे. या प्रकरणी हॉटेल मालक विठ्ठल ज्ञानदेव देवकाते यांनी दिलेल्या माहितीवरून जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दुसरी घटना ही तालुक्यातील तेलंगशी या ठिकाणी घडली. यामध्ये शुक्रवार 13 रोजी रात्री तेलंगशी येथील अर्जुन बाबु जावळे यांच्या शेतातील विहिरीत मयत प्रणीता गंगाधर ढाळे (17) रा तेलंगशी या कॉलेज तरुणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. प्रणीता ही इयत्ता अकरावी मध्ये शिकत होती. दुपारी शेळ्या चारण्यासाठी ती शेतात गेली होती. मात्र विहिरीजवळ अचानक पडल्याने तीचा पाण्यात पडुन मृत्यू झाला. सायंकाळी ती घरी न आल्याने घरच्यांनी तिची शोधाशोध केली. त्यानंतर विहीरी जवळ तिच्या चपला सापडल्या. यानंतर मयताचे चुलते मोहन नरहरी ढाळे यांनाही घटना समजताच त्यांनी सदरचा मृतदेह विहीरी बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. या प्रकरणी मोहन नरहरी ढाळे यांनी दिलेल्या माहितीवरून जामखेड पोलीस ठाण्याला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या दोन्ही घडलेल्या वेगवेगळ्या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अजय साठे व पोलीस हेडकॉन्स्टेबल नवनाथ भिताडे हे करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या