
जम्मू-कश्मीरातील सोपोर शहरात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत ‘लश्कर-ए-तोयबा’ संघटनेचा एक दहशतवादी ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सोपोर शहरातील एका फळ व्यापाऱयावर नुकत्याच झालेल्या हल्ल्यात त्याचा सहभाग होता असे अधिकाऱयांनी सांगितले. या चकमकीवेळी झालेल्या ग्रेनेडस्फोटात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत, मात्र त्यांच्या प्रकृतीला धोका नसल्याचे सांगण्यात आले.
बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर शहरात झालेल्या एका चकमकीत ‘लश्कर-ए-तोयबा’चा असिफ मकबूल भट्ट हा दहशतवादी ठार झाल्याचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मिळालेल्या माहितीच्या आधारे परिसरात नाकाबंदी करून शोधमोहीम राबविताना भट्ट पोलिसांना आढळला. त्याला शरण येण्यास सांगितले, मात्र त्याने पोलीस पथकावर ग्रेनेड फेकला. त्यामुळे चकमक उडाली.

























































