कश्मीरमध्ये 4 महिन्यांत 5 हजार फुटीरतावादी जेरबंद

299

 कश्मीर खोऱयात कलम 370 हटविल्याच्या आदल्या दिवसापासून चार महिन्यांत सुरक्षिततेचा उपाय म्हणून तब्बल 5161 फुटीरतावाद्यांना जेरबंद करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने बुधवारी संसदेत दिली. अटक करण्यात आलेल्या फुटीरतावाद्यांमध्ये दगडफेक करणारे, दहशतवाद्यांना सहाय्य करणारे आणि राजकीय क्षेत्रातील काही विरोधकांचाही समावेश आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी राज्यसभेतील प्रश्नोत्तरांच्या कालावधीत एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात पुढे म्हटले की, ही जेरबंदी 4 ऑगस्टपासून कश्मीरमध्ये शांतता आणि सुव्यवस्था भंग करणारे, देशाच्या सुरक्षिततेसाठी हानिकारक ठरणारे आणि कायदा मोडणारे यांच्या विरोधात सुरू केली होती. जम्मू- कश्मीरमध्ये सुरक्षिततेचा उपाय म्हणून 609जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात 218जण दगडफेक करणारे लोक आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

इंटरनेट सेवा लवकरच!

कश्मीर खोऱयात कलम 370 हटविल्यानंतर तीन महिन्यांनीही इंटरनेट सेवा सुरू झालेली नाही हे खरे, पण स्थानिक प्रशासनाने त्याबाबतची मागणी केल्यावर त्याबाबत कारवाई केली जाईल अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी राज्यसभेत दिली.

कश्मीर खोऱयात इंटरनेट सेवा का सुरू करण्यात आली नाही, असा सवाल काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केला होता त्यावर अमित शहा बोलत होते. शहा पुढे म्हणाले की, देशात इंटरनेट सेवाच अस्तित्वात नव्हती तेव्हाही कामकाज चालत होते. आरोग्य सुविधा आणि शिक्षणाच्या सोयी तेव्हाही योग्यप्रकारे चालत होत्या. देशभरात मोबाईल सुविधा 1995-96 च्या दरम्यान आली, मात्र कश्मीरमध्ये ही सुविधा सुरक्षिततेच्या कारणास्तव 2003 साली भाजपने आणली, असेही त्यांनी स्पष्ट केले. जेव्हा जम्मू-कश्मीरमधील प्रशासनाला योग्य वाटेल तेव्हा ते बैठक घेऊन त्याबाबतची मागणी करतील आणि तेव्हाच तेथे इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत विचार करता येईल, असेही अमित शहा म्हणाले.

 

आपली प्रतिक्रिया द्या