Jammu Kashmir – बांदीपोरा येथील छावणीमध्ये आग, बीएसएफचा एक जवान शहीद

बांदीपोरा येथील छावणीमध्ये सोमवारी पहाटे लागलेल्या आगीत सीमा सुरक्षा दलाचा 62 बटालियनचा एक जवान शहीद झाला. मादर येथे पहाटे 2 वाजून 34 मिनिटांनी आगीची घटना घडली. रमेश कुमार असे शहीद जवानाचे नाव आहे. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दल आणि आपत्कालीन पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

सदर छावणीमध्ये तीन खोल्या होत्या. त्यापैकी दोन खोल्या बीएसएफ जवान वापरत होते, तर एक खोली सलून म्हणून वापरली जात होती. अग्नीशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. आग विझल्यानंतर ढिगाऱ्यातून जवानाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. आग कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. याबाबत तपास सुरू आहे.