
जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात हिंदुस्थानी लष्कराची कारवाई सुरुच आहे. शनिवारी शोपिया आणि पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात आले.
एका पोलीस अधिकाऱ्याने चकमकीबाबत दिलेल्या माहितीनुसार, शोपिया जिल्ह्यातील चौगाम भागामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली होती. यानंतर सुरक्षा जवानांनी या भागाला घेराव घातला आणि शोधमोहीम सुरू केली. दहशतवाद्यांचा पत्ता लागताच सुरुवातीला त्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र त्यांनी नकार देत सुरक्षा जवानांवर गोळीबार सुरू केला. सुरक्षा जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामध्ये दोन दहशतवाद्यांना ठार मारले.
सुरक्षा जवानांनी ठार मारलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले आहे. सज्जाद अहमद चक आणि राजा बासित याकूब अशी दोन्ही दशतवाद्यांची नावे आहेत. दोघेही लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होते. दोघेही जम्मू-कश्मीर खोऱ्यातील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होते, अशीही माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच यातील सज्जाद अहमद चक याच्याकडे तरुणांना संघटनेमध्ये सहभागी करण्याची जबाबदारी होती, असेही अधिकाऱ्याने सांगितले.
#UPDATE | Two terrorists neutralized in an ongoing encounter between security forces and terrorists in Hardumir Tral area: IGP Kashmir Vijay Kumar
(file photo) pic.twitter.com/cjYSPSmujb
— ANI (@ANI) December 25, 2021
दहशतवाद्यांकडून विस्फोटके आणि दोन एके-47 रायफल, चार एके मॅगझिन आणि 32 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. शोपियाआधी पुलवामा जिल्ह्यातील त्राय भागातही एक चकमक उडाली होती. यातही दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते, असेही पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.



























































