जम्मू कश्मीर- कुलगाममध्ये सुरक्षा दलांना यश, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

941

एकिकडे देश कोरोना नावाच्या अदृश्य शत्रुशी झुंजत आहे, तर दुसरीकडे कश्मीरमध्ये देशाच्या शत्रुंचा नायनाट करण्यात सुरक्षा दले जुंपली आहेत. बडगाम जिल्ह्यातील यशस्वी मोहिमेनंतर आता कुलगाम जिल्ह्यातील मोहिमेत सुरक्षा दलांना यश आलं आहे. या मोहिमेत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, कुलगामच्या दमहल हांजीपोरा येथील खुर गावात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या माहितीवरून सोमवारी सकाळी शोधमोहीम राबवण्यात आली. जम्मू-कश्मीर पोलीस, सैन्य आणि सीआरपीएफ यांनी ही संयुक्त कारवाई केली. जशी सुरक्षा दलांची पथक खुर या गावातील एका घरानजीक आली, तसा गोळीबार सुरू झाला. त्या घरात लपून राहिलेल्या दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिलं. या चकमकी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. या घटनेनंतर कश्मीरमधील इंटरनेट सेवा काही काळ बंद करण्यात आली आहे.

रविवारी देखील जम्मू-कश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाला मोठे यश मिळालं. हिंदुस्थानी लष्कराच्या 53 आरआर पथक आणि बडगाम पोलिसांनी संयुक्तपणे शोध मोहिम हाती घेतली होती. या कारवाईदरम्यान सुरक्षा दलाने चार दहशतवाद्यांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये दहशतवाद्यांचा म्होरक्या वसीम गनी याचाही समावेश आहे. तो लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा मिलिटेंट असोसिएट आहे. या परिसरात लश्करच्या दहशतवाद्यांना आश्रय देण्यासह इतर मदत हा गट करत होता. त्याचप्रमाणे परिसरात दहशतवाद प्रस्थापित करण्यासह तरुणांना दहशतवादाकडे वळवण्याचे कामही या गटाकडून करण्यात येत होते. त्यामुळे या कारवाईत दहशतवाद्यांना झालेली अटक हे सुरक्षा दलाला मिळालेले मोठे यश मानलं जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या