
जम्मू आणि कश्मीरात डिसेंबर 2020 आणि जानेवारी महिन्यात अनेक वेळा जोरदार हिमवृष्टी झाली. आज हवामान खात्याने कश्मीरात हिमवृष्टी होण्याचा अंदाज वर्तविला आहे. जम्मू-कश्मीरची राजधानी असलेले श्रीनगर शहरात आज उणे 8.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हा जानेवारी 1991नंतरचा गेल्या 30 वर्षांतील तापमानाचा निचांक आहे. श्रीनगरातील 40 दिवसांच्या कडाक्यांच्या थंडीच्या हंगामीत आजचा दिवस हा सर्वात थंड दिवस होता, असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.
श्रीनगरातील हवामान खात्यातील हवामान तज्ञ मोहम्मद हुसेन मीर म्हणाले, आज श्रीनगर उणे 8.8 अंश सेल्सिअस तापमानामुळे गोठले आहे. 1991पासूनचा हा निचांक आहे. यापूर्वी 1991मध्ये उणे 11.8 अंश सेल्सिअस तापमानाची श्रीनगरात नोंद झाली होती. कश्मीर खोऱयात सध्या कडाक्याच्या थंडीची लाट आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
कडाक्याच्या थंडीमुळे कश्मीर खोऱयातील लोकांचे जनजीवन बिकट झाले आहे. वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. उणे तापमानामुळे पाणी गोठले आहे. तर रस्त्यावर साचलेल्या बर्फामुळे प्रवास कष्टप्रद झाला आहे. दाल आणि निगीन सरोवरे गोठली आहेत. लोकांना पिण्यास पाणी मिळणे कठीण झाले आहे.
गेल्या काही दिवसांत जलवाहिनी आणि पाण्याचे नळ गोठले आहेत. आमचा अर्धा दिवस गोठलेल्या जलवाहिनीवर गरम पाणी ओतून पाणी वाहते करण्यात जातो, असे श्रीनगरातील एका रहिवाशाने सांगितले.
श्रीनगरातील हवामान खात्याचे संचालक सोनम लोटस यांनी 1 ते 4 फेब्रुवारीदरम्यान जम्मृ-कश्मीर आणि लडाखमध्ये हलकी हिमवृष्टी होईल, असे भाकीत केले आहे. त्याचबरोबर हलका व मध्यम पाऊस होण्याचा अंदाज त्यांनी वर्तविला आहे.
पर्यटकांचे आवडते स्थळ असलेल्या पहलगाममध्ये आज उणे 12 अंश सेल्सिअस, तर गलमर्ग येथील स्की रिसॉर्टमध्ये उणे 8 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.
कश्मीरातील अतिथंड ठिकाणे व तापमान अंश सेल्सिअसमध्ये
द्रास – उणे 26.2
कारगिल – उणे 17.4
लेह -उणे 16.1
शोपिया – उणे 15.1
बालटाल – उणे 15.0
नुब्रा व्हॅले – उणे 15.0
थोई – उणे 14.7
कोकेरनाग – उणे 13.1
कुलगाम – उणे 12.1
पुलवामा -उणे 10.3
श्रीनगर – उणे 8.8


























































