
जम्मू-कश्मीरच्या पुलवामा जिह्यातील अवंतिपोरा भागात मंगळवारी सकाळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले असून, दोन जवान शहीद झाले आहेत. या दहशतवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. सीआरपीएफ, हिंदुस्थानी लष्कराची राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-कश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. अवंतिपोराच्या सातपोखरनमध्ये ही चकमक झाली. शहीद झालेल्या हिंदुस्थानी जवानांत लष्कराचा एक जवान आणि जम्मू-कश्मीर पोलीस दलाच्या एका विशेष अधिकाऱ्याला हौतात्म्य पत्करावे लागले. जतरंग आणि खेरू गावांत लष्कराचे कोम्बिंग ऑपरेशन जोरात सुरू आहे.
काही तासांनी घटनास्थळी गोळीबार थांबल्याचे वृत्त आहे. अवंतिपोरा विभागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा पथकांनी त्या भागाला घेराव घातला. दोन्ही बाजूंनी मोठय़ा प्रमाणावर गोळीबार झाला.



























































