
जम्मू कश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. लसीकरणाचे हे आव्हान पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने अनोखे मार्ग अवलंबले होते. त्यांनी लसीकरणाबाबतच्या गैरसमजांचा मोहिमेत अडथळा येऊ नये यासाठी मुस्लिम धर्मगुरुंची मदत घेतली होती. याशिवाय लाभार्थी निश्चित करण्यासाठी मतदार यादीचाही आधार घेण्यात आला होता. या दोन गोष्टींचा आधार घेत जिल्ह्यातील 45 वय पूर्ण केलेल्या सगळ्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले आहे. संपूर्ण देशात 45 पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणारा जम्मू हा पहिला जिल्हा ठरला आहे. त्यापाठोपाठ शोपियांनेही हे आव्हान पूर्ण केलं आहे.
लसीकरण मोहिमेला मार्च महिन्यात सुरूवात झाली होती. लसींचा तुटवडा, लोकांची उदासीनता, लसीबाबतचे गैरसमज यामुळे देशातील लसीकरण मोहीम ही कासवगतीने पुढे सरकते आहे. या परिस्थितीत जम्मू आणि शोपियां या दोन जिल्ह्यांनी इतर जिल्ह्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
शोपियां जिल्हा हा दहशतवादाने पोळलेला जिल्हा आहे. अशा ठिकाणी लसीकरणाचा एक महत्वाचा टप्पा पूर्ण केला जाणं ही लक्षणीय बाब आहे. लसीकरणाचा हा टप्पा पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाला जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी मदत केली. या मोहिमेसाठी औाफ समित्यांना विश्वासात घेण्यात आलं होतं. बूथ पातळीवरील अधिकारी आणि अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन 45 वर्षांवरील नागरिकांना लसीचा डोस मिळाला आहे की नाही याची खात्री पटवण्याचे काम केले.
झैनपुराचे उपजिल्हाधिकारी मुश्ताक लोन यांनी सांगितलं की लसींचा तुटवडा नसल्याने हा टप्पा वेगात पूर्ण करणं शक्य झालं. जिथे लसीकरण कमी होताना दिसत होतं, तिथे दुसऱ्याच दिवसापासून ते वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात होते. लोन यांनी सांगितलं की ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पोलीस आणि समाजात मानाचं स्थान असलेल्या व्यक्तींनी मनापासून सहकार्य केलं. यामुळे लसीकरण वेगात पूर्ण करणं शक्य झालं.


























































