श्रीनगरमधील शेवटच्या अतिरेक्याचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू आणि कश्मीर खोऱ्याच्या श्रीनगर जिह्यातील शेवटचा अतिरेकी पोलिसांशी झालेल्या चकमकीत शनिवारी ठार झाल्याचे कश्मीर पोलिसांनी म्हटले आहे. आता यानंतर श्रीनगर जिह्यात राहणारा कोणताही सक्रीय अतिरेकी शिल्लक नसल्याचा दावा पोलिसांनी केला असून यास मोठे यश मानले जात आहे.

श्रीनगरमध्ये पोलीसांशी झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले आहेत. त्यात लष्करचा कमांडर इशफाक रशीद याचाही समावेश होता. इशफाक श्रीनगरचा राहणारा शेवटचा अतिरेकी उरला होता. पोलीस त्याच्या मागावर खूप काळापासून होते. यासंदर्भात पोलिसांनी रविवारी अधिकृतपणे माहिती दिली की, श्रीनगरचा राहणारा हा शेवटचा अतिरेकी होता. हे मोठे यश मानले जात आहे. श्रीनगरचे अनेक अतिरेकी कश्मीरमध्ये सक्रीय होते. याशिवाय असेही लोक होते जे अतिरेक्यांसाठी अनेक प्रकारची कामे करायचे, परंतु आता हे कनेक्शन पोलिसांनी तोडून टाकल्याचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी स्पष्ट केले.

या वर्षी 146 अतिरेकी ठार

अतिरेक्यांच्या विरोधातील मोहिमेत पोलीसांना दर महिन्याला यश मिळत आहे. अनेक विभागांना दहशतवाद मुक्त जाहीर करण्यात आले आहे. जुलै महिन्यांत आतापर्यंत कश्मीरमध्ये नऊ चकमकी झाल्या त्यात 16 अतिरेकी मारले गेले आहेत. यावर्षी 50 चकमकी झाल्या असून त्यात 146 अतिरेकी ठार झाले आहेत.