जामसंडे अपघाती मृत्यू प्रकरणी एस. टी. चालकाला जामीन मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जामसंडे दिर्बादेवी स्थानकाजवळ 8 जुलै 2023 रोजी सकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास एसटीने रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जात दोन युवकांना धडक दिली होती. त्यात एकाचा मृत्यू झाला होता. तर दुसरा गंभीर जखमी झाला होता. या अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी एसटी चालक संजय रविंद्र पाटील याला देवगड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.बी.घाडगे यांनी जामीन मंजूर केला आहे.

एसटी चालकाच्या वतीने अॅड. कुळकर्णी आणि अॅड. कौस्तुभ मराठे यांनी काम पाहिले. आनंदवाडी येथे राहणारे तेजस तुषार बांदेकर व तन्मय तुषार बांदेकर या दोन महाविद्यालयीन तरुणांना पहाटे 6.15 वाजण्याच्या सुमारास देवगड-वानिवडे गाडी चालवणाऱ्या एस.टी. चालकाने रस्त्याच्या विरुध्द बाजूला जात धडक दिली होती. या तरुणांना धडक दिल्यानंतर संबंधित एस.टी. रस्त्यानजीक असलेल्या दुकानाच्या शेडमध्ये घुसली होती. या भीषण अपघातात गंभीर दुखापत झालेला तेजस तुषार बांदेकरच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्याचा कोल्हापूर येथे मृत्यू झाला होता. तर दुसरा दुचाकीस्वार तन्मय तुषार बांदेकर हा गंभीररित्या जखमी झाला होता. याप्रकरणी देवगड पोलिसांनी एस.टी चालक संजय रविंद्र पाटील याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्याला न्यायालयात हजर केले असता देवगड न्यायालयाने एस.टी. चालकाला जामीन मंजूर केला आहे.