देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीत स्थानिक भाजी विक्रेते आणि बाहेरील भाजी विक्रेते यांच्यात पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. परप्रांतीय भाजी विक्रेते देवगड शहरात दाखल होऊन त्यांनी देवगड निपाणी मार्गावरील देवगड कॉलेज नाका ते सातपायरी या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटली. पर्यायाने ग्राहकांनी याठिकाणी गर्दी केल्याने वाहतुकीची कोंडी झाली.
देवगड पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र साळुंखे पोलीस हवालदार एस डी कांबळे,वाहतूक पोलीस मिलिंद परब,निलेश पाटील यांनी घटनास्थळी चोख बंदोबस्त ठेवून वाहातुक कोंडी टाळण्यासाठी विशेष प्रयत्न केले. याठिकाणी स्थानिक भाजी विक्रेते संघटनेचे पदाधिकारी तसेच व्यापारी देखील उपस्थित होते.त्यामुळे पुन्हा एकदा स्थानिक व बाहेरील भाजी विक्रेते यांचेमध्ये संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नगरपंचायत प्रशासन मार्फत आवश्यक त्या सूचना संबंधित व्यापारी बंधूंना देण्यात येत होत्या.कोरोना संक्रमण काळात आठवडा बाजार बंद असून बाजारच्या निमित्ताने देवगड सडा परिसरात झालेली वाहनांची गर्दी व कोंडी सोडविण्याकरिता ठोस उपाययोजना स्थानिक प्रशासनाने करणे महत्वाचे आहे.

































































