
सामना प्रतिनिधी । सेलू
आपण काढलेली जन आशीर्वाद यात्रा ही राजकीय स्वरूपाची किंवा मतांसाठी नाही तर जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी आहे. माझ्यासाठी ही यात्रा म्हणजे तीर्थयात्राच आहे असे प्रतिपादन शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. साई नाट्यगृहात जिंतूर-सेलू शिवसेनेतर्फे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह पर्यावरण मंत्री रामदास कदम, माजी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार संजय जाधव, जिल्हाप्रमुख सुरेश ढगे, महिला जिल्हा संघटक मंगल कथले, विधानसभाप्रमुख राम पाटील,उपजिल्हाप्रमुख रणजित गजमल,तालुकाप्रमुख रमेश डख, शहरप्रमुख मनीष कदम आदी उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘जनतेचा आशीर्वाद,प्रेम प्रत्येक ठिकाणी मिळत आहे. ही कोणतीही राजकीय यात्रा नाही, मतांसाठी नाही तर ही यात्रा केवळ तीर्थयात्रा जशी असते तशी आहे आणि माझ्यासाठी जनताच देव आहे. या जनतेचे दर्शन घेण्यासाठीच ही यात्रा मी करीत आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वारसा मला लाभल्याने सामान्य जनतेसाठी समाजकार्य करण्यासाठी व जनतेची कामे करण्यासाठी मी ही यात्रा काढली आहे. ज्यांनी शिवसेनेला लोकसभेत मतदान केले त्यांचे आशीर्वाद तर घ्यायचे आहेतच पण विरोधकांची मनेही या यात्रेच्या माध्यमातून जिंकायची आहेत. जनतेच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवायचा आहे. यासाठी जनतेचा आशीर्वाद गरजेचा आहे. महाराष्ट्रातील जनता जेव्हा संकटात असते तेव्हा प्रत्येक ठिकाणी जनतेसोबत शिवसेना असते. जिथे शिवसेनेची गरज असेल तिथे शिवसेना व शिवसैनिक हजर असतात. शेतकऱ्यांसाठी शिवसेना नेहमी तत्पर आहे. शेतकऱ्यांसाठी पूर्ण कर्जमाफी करून घेणारच आहे. नवीन महाराष्ट्र जो असणार आहे तो कर्जमुक्त, बेरोजगारी मुक्त असणार आहे. सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडवायचा आहे. सामान्य जनतेचा आशीर्वादच नवीन महाराष्ट्र घडवण्यासाठी गरजेचा आहे. शिवसेनेला मतदान जरी केले नसेल तरी शिवसेनेला मदतीसाठी हाक मारा शिवसेना केव्हाही मदतीला तयार आहे,’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.
यावेळी जिंतूर सेलू विधानसभाप्रमुख राम पाटील यांच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आदित्य ठाकरे यांच्या हस्ते खतांचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना नगरसेवक संदीप लहाने,अविनाश शेरे,नरेंद्र दिशागत,माजी तालुकाप्रमुख काशिनाथ घुमरे,उपतालुकाप्रमुख जिजाभाऊ सोळंके,रामेश्वर बहिरट,शेषराव वाघमोडे,शत्रुघ्न मगर, विठ्ठलराव जाधव,गौतम कनकुटे, पवन घुमरे ,रवि कटारे ,विनोद कटारे ,नवनाथ खांडेकर ,अतुल डख,बाबा भाबट, पांडुरंग कावळे,योगेश कथले,वारकरी सेनेचे तालुकाध्यक्ष विठ्ठल महाराज कारके,लिंबाजी कलाल,शेखर कथले,गुलाबराव खेडेकर, ओमकार पवार,अनिल रोडगे,माऊली बुधवंत,वैभव वैद्य आदींसह शेकडो महिला व शिवसैनिकांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ग्रामीण भागासह शहरी भागात लोकप्रिय असलेले प्रमुख कार्यकर्ते शक्ती बोराडे यांनी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मान्यवरांनी बोराडे यांचे शिवसेनेत स्वागत केले.
























































