जंजिरा किल्ला, निसर्ग आणि निळाशार समुद्र, विद्यार्थ्यांच्या सहलीने मुरुड गजबजले

दिवाळीच्या सुट्टीनंतर शैक्षणिक सहलींचा हंगाम सुरू झाला आहे. विद्यार्थ्यांना ऐतिहासिक माहिती मिळावी यासाठी सहलींचे आयोजन केले जाते. महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून कोकणचा निसर्ग, जंजिरा किल्ला आणि निळाशार समुद्र पाहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहली मुरुडमध्ये दाखाल होत आहेत. मुरुडचे समुद्रकिनारे मुलांच्या किलबिलाटाने गजबजून गेले आहेत.
शैक्षणिक सहलींचा हंगाम सुरू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून शालेय विद्यार्थ्यांच्या सहली रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. त्यामुळे मुरुडचे समुद्रकिनारे शालेय सहलीने बहरली आहेत. मुले कोकणातील निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटत आहेत. मुरुड-जंजिरा किल्ला सहलीचे आकर्षण आणि कुतूहलाचा विषय ठरतो आहे. समुद्राच्या मध्यभागी किल्ला असूनसुद्धा गोड्या पाण्याची दोन मोठी सरोवर आहेत. मुरुड-जंजिरा किल्ला पाहण्यासाठी आलेले विद्यार्थी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्याचा आनंद लुटत आहेत.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून सहली कोकणात
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, सोलापूर, अकोला, बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, अमरावती, पालघर, संभाजीनगर, परभणी, लातूर, चंद्रपूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून शालेय सहली दाखल होत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या सहलींमुळे कोकणचे पर्यटन चांगलेच बहरले आहे.