शिक्षणविरोधी विधेयकाची जनता दलाकडून राज्यव्यापी होळी

शिक्षणविरोधी खासगी विद्यापीठ विधेयकाची आज धारावीत जनता दल युनायटेडच्या (जेडीयू) वतीने होळी करण्यात आली. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात खासगी विद्यापीठांच्या संदर्भातील हे विधेयक मंजूर झाले आहे. या विधेयकामुळे गरीब, कामगार, कष्टकरी यांच्या मुलांचे शिक्षण संकटात आले आहे. याविरोधात जेडीयूच्या वतीने धारावीत या विधेयकाची होळी करत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.

विधानसभेत विनाविरोध संमत झालेल्या या विधेयकाला विधान परिषदेत जेडीयूचे आमदार कपिल पाटील यांनी विरोध केला होता. सध्या हे विधेयक अंतिम मान्यतेसाठी राज्यपालांकडे आहे. राज्यभर या शिक्षणविरोधी विधेयकाची होळी करण्यात येत असल्याचे जेडीयूचे मुंबई महासचिव सचिन बनसोडे यांनी सांगितले. आज धारावीत येथे झालेल्या आंदोलनात जेडीयूचे मुंबई अध्यक्ष अमित झा, उपाध्यक्ष अन्वर कमाल शेख, राज्य उपाध्यक्ष अरुण लावंड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.