तैवानवर लष्करी कारवाई केली तर आम्ही…; जपानचा चीनला थेट इशारा

जपानने तैवानच्या रक्षणासाठी सैन्य पाठवण्याची तयारी दाखवल्याने चीनने तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यामुळे चीन आणि जपान यांच्यात तणाव वाढला असून चीनमधील जपानी नागरिकांसाठी इशारा जारी केला आहे.

जपान आणि चीनमधील राजकीय अविश्वास हा फार जुना आहे. जपानचे नवे पंतप्रधान निवडून आल्यानंतर चीन आणि जपानमध्ये आणखी तणाव वाढला आहे. जपानचे पंतप्रधान साने ताकाइची संसदेत म्हणाले की, चीनने तैवानवर लष्करी कारवाई केली तर, हे जपानच्या अस्तित्वासाठी मोठं संकट असणार आहे आणि टोकियोला प्रत्युत्तरात्मक लष्करी कारवाई करावी लागू शकते, असा इशारा दिला आहे. त्यांच्या या वक्तव्याने आशिया आणि प्रशांत क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

ताकाइची यांच्या वक्तव्यानंतर चीनने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. साने ताकाइची यांच्या विधानानंतर चीनने तीव्र शब्दांत निवेदन जारी केले. सरकारी प्रवक्ते, माध्यमे आणि कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न सर्वांनी जपानच्या विधानावर चिथावणीखोर आणि प्रादेशिक शांततेला धोका असल्याचे म्हणत टीका केली आणि टोकियोवर जाणूनबुजून तणाव वाढवल्याचा आरोप केला. यामुळे चीनमध्ये जपानविरोधी भावना आणखी तीव्र झाल्या आहेत.