बुमराहला द्यावी लागणार फिटनेस टेस्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2020 सालामध्ये जानेवारी महिन्यात हिंदुस्थानी संघ घरच्या मैदानावर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार आहे. गेले काही महिने पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला जसप्रीत बुमराहने हिंदुस्थानी संघात पुनरागमन केले आहे, मात्र या मालिकेआधी जसप्रीत बुमराहला आपली शारीरिक तंदुरुस्ती सिद्ध करावी लागणार आहे. यासाठी जसप्रीत बुमराह रणजी क्रिकेट सामन्यात खेळणार आहे. बुधवारी गुजरात विरुद्ध केरळ सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराह गुजरातचे प्रतिनिधित्व करणार आहे. निवड समितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद या सामन्याला हजर असणार आहेत.

सुपर सीरिजवर प्रश्नचिन्ह

हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या क्रिकेटमधील तीन बलाढय़ देशांच्या पुढाकाराने 2021 सालापासून वर्षाला चौरंगी क्रिकेट मालिकेच्या (सुपर सीरिज) आयोजनाचा प्रस्ताव पुढे आला आहे. बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलियाप्रमाणे इंग्लंड ऍण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाकडूनही या मालिकेला थम्स अप दाखवण्यात आला आहे. मात्र आयसीसीकडून या मालिकेला ग्रीन सिग्नल दाखवण्यात आलेला नाही. त्यामुळे सुपर सीरिज मालिकेवर अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे.