बुमराने दोन्ही कसोटींत खेळायला हवे, अनिल कुंबळेची स्पष्ट भूमिका

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत हिंदुस्थान 1-2 अशा पिछाडीवर आहे. मालिकेतील आता केवळ दोन कसोटी सामने उरलेत. अशा निर्णायक टप्प्यावर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला उर्वरित दोन्ही कसोटींमध्ये खेळायला हवे आणि संघ व्यवस्थापनानेही त्याला खेळवायला हवे, अशी स्पष्ट भूमिका हिंदुस्थानचा  माजी कर्णधार आणि महान फिरकीवीर अनिल कुंबळेने मांडली आहे.

सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत बुमराचे खेळणे आणि न खेळणे हेच सर्वात मोठे लोड झालेय. त्याबाबत क्रिकेट विश्वातून टीकेचा आणि नाराजीचा सूर येऊ लागला आहे. कुंबळेनेही एका क्रिकेट वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपली भावना बोलून दाखवली. तो म्हणाला, मी नक्कीच बुमराला पुढच्या दोन्ही कसोटीत खेळवायला सांगितले असते. कारण सध्याची स्थिती फारच निर्णायक आहे. जर तो खेळला नाही आणि आपण सामना हरलो तर आपण मालिकाही गमावू. म्हणून बुमराला उर्वरित दोन्ही कसोटींत खेळायला हवे. हो, सुरुवातीला सांगितले गेले होते की तो केवळ तीन कसोटीतच खेळणार, पण आता दीर्घ विश्रांती घेण्यासाठी भरपूर वेळ मिळाला आहे. लॉर्ड्सनंतर सात दिवसांची दीर्घ विश्रांती आहे.

सध्या संघाची परिस्थिती बदलल्यामुळे आता तो उर्वरित दोन्ही सामन्यांसाठी उपयुक्त ठरू शकतो, असेही कुंबळे म्हणाला. कुंबळेसारखीच भूमिका हिंदुस्थानी संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक व्यक्त करत आहेत.

खेळाडू फिट असेलतर खेळायलाच हवे, वर्कलोडच्या मुद्द्यावर वेंगसरकरांची टीका

बुमराने मालिकेत आतापर्यंत जबरदस्त प्रभाव टाकला आहे. त्याच्या नेतृत्वाखालील गोलंदाजीने हिंदुस्थानला एकमेव विजय मिळवून दिला. त्यामुळे उर्वरित कसोटींमध्ये त्याचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो.

हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यातील पुढील कसोटी 23 जुलैपासून ओल्ड ट्रफर्ड, मँचेस्टर येथे खेळवली जाणार आहे. ही कसोटी हिंदुस्थानसाठी ‘करो अथवा मरो’ अशी ठरणार असून बुमराचा खेळात सहभाग निर्णायक ठरू शकतो, असे मत क्रिकेट विश्लेषक व्यक्त करत आहेत.