भाजपला धक्का! ‘कमल का फूल हमारी भूल थी’, मानवेंद्र सिंहांचा पक्षाला राम-राम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जयपूर

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अशातच भाजपचे संस्थापक सदस्य आणि माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात देशाचे संरक्षण मंत्री जसवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र सिंह यांनी पक्षाला राम-राम केल्याने सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे. मानवेंद्र सिंह यांनी बाडमेरमध्ये झालेल्या स्वाभिमान रॅलीमध्ये भाजपाविरोधात बंडाचा झेंडा फडकावला. यावेळी बोलताना त्यानी ‘कमल का फूल हमारी भूल थी’ असा टोला भाजपला लगावला आणि पक्षामधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला.

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत बाडमेर चर्चेचा विषय ठरला होता. तसेच, 2018 मध्ये सुद्धा सर्वांचे लक्ष बाडमेरकडे असणार आहे, असे यावेळी मानवेंद्र सिंह म्हणाले. बाडमेरमध्ये याआधी गौरव आणि संकल्प रॅली झाली आहे. मात्र आज स्वाभिमान रॅली आहे. या रॅलीच्या माध्यमातून स्वाभिमानासाठी लोक एकत्र आले आहेत. या लढाईत 36 समाजातील लोक आमच्यासोबत आहेत, असा दावा मानवेंद्र सिंह यांनी केला आहे.

जसवंत सिंह यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बाडमेर येथून तिकीट देण्याऐवजी कर्नल सोनाराम चौधरी यांना तिकीट देण्यात आले. यामागे मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा हात असल्याची चर्चा त्यावेळी होती. त्यामुळे जसवंत सिंह अपक्ष म्हणून लढले आणि 4 लाखांहून अधिक मतांनी जिंकून आले. तेव्हा मानवेंद्र यांनी भाजप उमेदवाराच्या प्रचाराला विरोध करत आपल्या वडिलांचा प्रचार केला होता. त्यामुळे भाजपने मानवेंद्र यांना राष्ट्रीय कार्यकारणीतून बाहेर काढले होते आणि पक्षातून हकालपट्टीची घोषणाही केली होती. मात्र पक्षातून हकालपट्टीसंदर्भात कोणतही पत्र दिले नाही. त्यामुळे मानवेंद्र हे भाजपचेच आमदार आहेत. परंतु त्यांनी आता पक्षाला रामराम करण्याचा निर्णय जाहीर केला.