
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईने शनिवारपासून येथे सुरू झालेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील एलिट ‘अ’ गटातील सौराष्ट्रविरुद्धच्या लढतीत दमदार सुरुवात केली. सलामीवीर जय बिस्ताच्या धडाकेबाज 127 धावा आणि विक्रांत औsटी (57 धावा) व कर्णधार सिद्धेश लाड (नाबाद 84 धावा) यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर मुंबईने पहिल्या दिवसअखेरीस 5 बाद 334 धावा फटकावल्या.
सौराष्ट्रने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. जय बिस्ता व विक्रांत औटी या सलामीवीरांनी 174 धावांची सणसणीत भागीदारी करताना सौराष्ट्रच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. धमेंद्र जाडेजाने जय बिस्ताला 127 धावांवर बाद करीत जोडी फोडली. जय बिस्ताने आपल्या खेळीत 21 चौकारांची आतषबाजी केली. त्यानंतर कर्णधार जयदेव उनाडकट याने विक्रांत औटीला 57 धावांवर बाद करीत मुंबईला दुसरा धक्का दिला. या खेळीत त्याने सहा चौकार मारले.
यानंतर मुंबईचा संघ मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत असतानाच मधल्या फळीने निराशा केली. सिद्धेश लाड एका बाजूने किल्ला लढवत असतानाच दुसर्या बाजूने फलंदाज बाद होत गेले. श्रेयस अय्यर (6 धावा), शुभम रांजणे (9 धावा) आणि आदित्य तरे (7 धावा) या खेळाडूंना आपला ठसा उमटवता आला नाही.



























































