मी कुठेही जाणार नाही; भाजप प्रवेशाच्या चर्चांवर जयंत पाटलांनी मौन सोडलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने पुन्हा फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. सोमवारी सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. या चर्चांवर जयंत पाटील यांनी मौन सोडत स्पष्टीकरण दिले आहे.

माध्यम प्रतिनिधींनी भाजप प्रवेशाच्या चर्चांवर विचारले असता जयंत पाटील म्हणाले की, काही कुठे येणार नाही आणि जाणार नाही. माझ्या नावाची चर्चा असेल तर चांगलेच आहे. प्रसिद्धी मिळाली की लोकांसमोर जाता येते. आपण यावर नंतर बोलू.

दरम्यान, यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली असून पत्रकारांकडे असलेली माहिती माझ्याकडे नाही. परंतु कधीही काहीही होऊ शकते, असे ते म्हणाले. तसेच जयंत पाटील आणि आपल्यात कोणतीही चर्चा झाली नसून त्यांनी आमच्या पक्षात येण्यासाठी संपर्कही केला नाही, असे म्हणत बावनकुळे यांनी या चर्चांमधील हवा काढून घेतली.

भाजपमध्ये दम राहिला नाही

भारतीय जनता पक्ष दुसऱ्या पक्षाचे नेते पळवत आहे. त्यांच्यात निवडणूक जिंकण्याचा दम राहिला नसल्याचा हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.