
उदयनराजे संध्याकाळी कोणत्या परिस्थितीत बोलले हे तपासले पाहिजे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
राष्ट्रवादी सवांद यात्रेनिमित्त शुक्रवारी सायंकाळी जामखेडमध्ये बोलत होते. छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यानंतर ‘जे केलंय ते इथच फेडाव लागेल’, असं विधान केलं होतं. त्यावर पाटील यांनी उदयनराजे संध्याकाळी कोणत्या परिस्थितीत बोलले हे तपासले पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी जयंत पाटील म्हणाले, शरद पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांना गेली 40 वर्ष वेळोवेळी मदत केली आहे, आधार दिला. त्यामुळे खरा एसटी कर्मचारी पवारांच्या घरापर्यंत अश्या पद्धतीने जाणार नाही. हे जाणीवपूर्वक केलेलं कृत्य आहे. जे तिथे आले, ते एसटी कर्मचारी होते का? ते कोणत्या परिस्थितीत होते? हे सत्य बाहेर येईल.
या हल्ल्यानंतर ॲड. गुणरत्न सदावर्ते याना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर माझ्या जिवाचे काही बर वाईट झालं तर पोलीस जबाबदार राहतील असा आरोप केला होता. यावर ‘त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांकडे काही तरी कारण असेल, त्याप्रमाणे कारवाई होईल. असली स्टंटबाजी बंद झाली पाहिजे, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.
























































