
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मध्यंतरी एक क्लिप आली होती. भाजपचा अन्याय सहन होत नाही असे बोलून राजीनामा देत आहोत असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितले. त्याचवेळेस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार केले तेव्हा एकनाथ शिंदे यांना शिवसैनिकांच्या वेदना दिसल्या नाहीत का, असा सणसणीत सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आमदार जयंत पाटील यांनी आज केला. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांना, आमदारांना चिमटे काढले.
शिवसेना सत्याच्या बाजूने
शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस ही अनैसर्गिक युती होती असे तुम्ही आता बोलता; पण आमच्याबरोबर होता त्यावेळी असा शब्द काढला नाही. भाजपसोबत युती नैसर्गिक युती आणि आमच्यासोबत अनैसर्गिक युती हे कसे काय, असा सवाल केला. निवडणुका झाल्यावर युत्या होतात, परंतु आमची झाली ती अनैसर्गिक युती कशी काय? याआधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपती निवडणुकीत पाठिंबा दिला होता. प्रणव मुखर्जी यांच्या वेळी पाठिंबा दिला होता. ज्यावेळी महाराष्ट्राला गरज होती तेव्हा शिवसेना सत्याच्या बाजूने उभी राहिली आहे हे जयंत पाटील यांनी ठामपणे सांगितले.
दिल्लीदरबारी शेवटच्या रांगेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले होते तेव्हा शेवटच्या रांगेत उभे असलेला त्यांचा पह्टो प्रसिद्ध झाला होता. त्याचा उल्लेख करताना जयंत पाटील म्हणाले, औरंगजेबाच्या दरबारात शेवटच्या रांगेत छत्रपती शिवाजी महाराजांना उभे करण्यात आले तो अपमान समजून शिवाजी महाराज थेट निघून आले होते; पण एकनाथ शिंदे यांनी ते सहन का केले, असा सवाल केला.
आम्हाला वाटले मोदी फडणवीसांचे ऐकतात
छत्रपती शिवाजी महाराजांनी सतरा वेळा सुरत लुटली; पण तुम्ही स्वारीसाठी नव्हे, तर शरणागती पत्करण्यासाठी गेलात. तुमच्या शरणागतीने महाराष्ट्राची मान खाली गेली. पुढे सुरतेवरून गुवाहाटीला गेला. हा सर्व प्रवास पाहिल्यावर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असे वाटत होते. कारण फडणवीस जे सांगतात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐकतात असा आमचा समज होता, अशी कोपरखळी जयंत पाटील यांनी फडणवीसांना मारली.

































































