
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडत अजित पवार गट वेगळा झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचं स्पष्ट केलं आहे. असं असतानाच आता सांगलीचे भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत सूचक विधान केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.
मिरज येथे एका कार्यक्रमात संजयकाका पाटील म्हणाले की, 15 दिवसांपूर्वी जयंत पाटलांचा सुरेश बापूंनी कार्यक्रम घेतला. ते आता भाजपमध्ये येतायत की राष्ट्रवादीत जातायत की अजितदादांच्या गटात जातात? निशीकांत दादा आपल्याला ‘होकायंत्रानं’ इशारा दिला आहे, असं विधान संजयकाकांनी केलं आहे. त्यामुळे जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. विशेष म्हणजे या बैठकीला जयंत पाटील समर्थकांनी हजेरी लावली होती. त्याच वेळी जयंत पाटील सध्या ईडीच्या फेऱ्यात अडकल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच ते देखील भाजपसोबत जातील, अशी चर्चा सुरू आहे.
दरम्यान, याआधी जयंत पाटील यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्याचवेळी अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीदरम्यान जयंत पाटील देखील तिथं उपस्थित होते. ही कौटुंबिक भेट असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र जयंत पाटील हे तर कुटुंबातील नाहीत, मग ते तिथं कसे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.



























































