
>> जयश्री संगीतराव
सवती मत्सर वाऱ्यालाही उभा राहणार नाही अशा सात्विक मनाच्या पुतळाबाईंना महाराजांचे मन ओळखता येत होते. महाराजांच्या प्रेमाची आणि शंभू महाराजांच्या ममतेची सावली असलेल्या पुतळाबाईंना सतीच्या रूपात मरण आले. वांझ ठरवलं गेलेल्या पुतळाला शंभुबाळाच्या मांडीवर पुत्रवती मरण आलं म्हणून या मातेचा जीव जातानाही सुखावला.
महाराजांच्या मोहिमा चालूच होत्या. अफझलखानाने भेटीला बोलावलं तेव्हा आऊसाहेब अस्वस्थ जाणवल्या. महाराजांना निरोप देताना त्या बोलून गेल्या, भोसल्यांचा कबिला कधीच कचदिल असणार नाही, पण भोसल्यांच्या कबिल्याला सहस्र इंगळ्यांचे बाशिंग बांधूनच वाडय़ाचे माप ओलांडावे लागते.’ आपल्या थोरल्या पुत्राला दगाफटका करून मारणाऱया खानाचा आऊसाहेबांनी चांगलाच धसका घेतला होता, पण महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढून त्याचं सुकलेल्या रक्ताने माखलेलं शिर जेव्हा आऊसाहेबांना भेट म्हणून पाठवलं तेव्हा ‘अफझलखाना… पेरावं तसंच उगवतं’ अशा आवेशाने बोलत त्यांनी जनतेने त्याला बघावं असं फर्मान सोडलं. त्यांचा हा रुद्रावतार बघून मन म्हणत होतं, उगाच नाही महाराजांमध्ये इतकी हिंमत, धैर्य आणि शूरता आली. वाघिणीचं दूध प्यायलेला बछडा आहे तो! आम्ही मनोमन आमच्या सौभाग्याला आणि भरल्या चुड्याला लाख वेळा धन्यवाद दिले. महाराज जव्हारच्या वेढ्यात अडकले होते तेव्हा मन म्हणत होतं, किती मरणांना बगल देत आमच्या महाराजांनी दौडावं! सुखाचा विचार करताच किती संकटांनी हातात हात घालून यावं. आम्ही मनातलं शल्य बोलून दाखवू शकत नव्हतो. महाराज रायगडी परत आले तेव्हा आऊसाहेबांनी आपल्या मनीची रुखरुख बोलून दाखवली, पण आमचं काय? आम्ही एकांतात आपले अश्रू पुसत होतो, तर कधी दर्पणात बघून गालातल्या गालात हसून स्वतचा आनंद निरखत होतो.
प्रत्येक दिवस नवीन काहीतरी वार्ता घेऊन यायचा. औरंगजेबाच्या भेटीला शंभू बाळाला घेऊन गेलेले महाराज नजर कैदेतून निसटून रायगडावर परतले. सारा गड आनंदला, पण क्षणभरच! शंभू बाळ कुठे आहेत? एकच गलका झाला. तसे “आऊसाहेब, बाळराजे आपल्याला सोडून गेले,” असे म्हणताच आमच्या हृदयाचे पाणी पाणी झाले. पोरसवदा बाळराजांचे श्राद्ध घातले गेले. आम्ही हतबल होतो, काय उत्तर द्यावं सईबाईंना? मनाला पीळ पडत होता. कितीदा तरी भवानी मातेला सवाल करून झाला आणि एके दिवशी बटू वेशातले शंभू बाळ गडावर परतले. तेव्हा कळलं, काही दगाफटका होऊ नये म्हणून महाराजांनीच त्यांना मथुरेत सुरक्षित ठिकाणी ठेवून ते गेल्याची वार्ता पसरवली. काय म्हणावे या राजनीतीला? महाराजांचं हृदय काही हैवानाचं नव्हतं. कसा दगड ठेवला असेल बापाने आपल्या काळजावर? पण केवढी ही सावधगिरी! अफाट निर्णयक्षमता. असं असलं तरी त्या दिवशी आम्हांस त्यांच्यातला हळवेपणा दिसलाच. आम्ही महाली समईच्या वाती शांत करत होतो. तेवढय़ात महाराज महाली आल्याची वार्ता आली. आम्ही वळून बघेस्तोवर ते आमच्या समीप येऊन ठाकलेसुद्धा. पाठोपाठ शब्द आले, “थांबा पुतळा राणी, आज वाती शांत करू नका. अहो, आज तर आम्हाला आमच्या सई राणीला सफाई द्यायची आहे या समईच्या पुढय़ात. कारण त्या तेजस्वी ज्योतीत आम्हांस आमच्या सईची नजर दिसते. त्या लखलखणाऱ्या ज्योती आमचं मन सईबाईपर्यंत पोहोचवतात आणि त्यांच्या भावना त्यातूनच आम्हांस कळतात. आम्ही हे फक्त आणि फक्त आपल्याच जवळ बोलू शकतो. कारण आपलं मन इतकं शुद्ध आहे की, सवती मत्सर तेथे वाऱ्यालाही उभा राहत नाही.” आम्ही पहिल्यांदा पहाड पाझरताना बघितला. खरं सांगू, तो क्षण आम्ही आऊसाहेब होऊनच जगलो. छत्रपतीसुद्धा हळवा होऊ शकतो हे जवळून बघितलं.
दिसामागून दिस सरत होते. कोणास ठाऊक, पण रायगडाचे वातावरण मात्र बदलू लागले होते. कधी कधी महाराजही शंभूराजांबद्दल साशंक वाटत होते. हे बघून मनात चर्र होत होतं. कधी नव्हे ते दोन पुत्रांमध्ये राज्याची दोन भागांत वाटणी करण्याचं महाराजांच्या मनात येऊ लागलं. त्यांच्या मनातली खळबळ जाणवत होती. मनातलं बोलायला आऊसाहेब राहिल्या नव्हत्या. रायगड बदलत चाललाय हे आम्हालाही कळत होतं. शंभूराजांना हेतुपुरस्पर दूर ठेवलं जाऊ लागलं. शंभूची काळजी प्रत्येक शब्दात आणि डबडबलेल्या डोळ्यांत दिसत होती. गळा दाटून येत होता. गडावर चाललेल्या राजकारणाने दुखावलेलं मन आमच्या लक्षात येत होतं.
खरं सांगतोय, महाराजांना इतकं हवालदिल झालेलं आम्ही पहिल्यांदाच बघत होतो. त्यांच्या अगतिकतेपुढे आमचा अपमान कवडीमोल वाटत होता. आणखी अपशब्दांनी आम्ही घायाळ होऊ नये म्हणून त्यांनी आम्हांस थांबवलं नसावं, पण का कुणास ठाऊक, गड उतरायला पाय धजत नव्हते. पाऊल अडखळत होतं. नजर वारंवार मागे जात होती. आम्ही गडावर पोहोचतो न पोहोचतो तोच महाराजांना ज्वराने गाठलं. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती अधिकच क्षीण होत होती. राजवैद्य आले, सगळे उपाय झाले, पण प्रकृतीस आराम नव्हता. महाराजांची शुद्ध हरपू लागली. त्याही अवस्थेत ते आमची व शंभूराजांची आठवण काढू लागले. आम्हांस बोलवा म्हणून विनवू लागले, पण ना खलित्यास पाय फुटले ना मेण्यास वेग आला. गडाची चढण-उतरण बंद करण्यात आली होती. आमचं मन का कुणास ठाऊक, अशांत होतं आणि एक दिवस ती अशुभ, अभद्र वार्ता आलीच. महाराज साऱयांना सोडून गेले. आत्मा आणि देह अनंतात विलीन झाला होता. आपल्या पित्यास अग्नी देण्याचा मान ज्येष्ठ पुत्राकडून हिरावून घेतला गेला होता. आमचे केवळ श्वास चालू होते. मन केव्हाच विरून गेले होते. भावना थिजून गेल्या होत्या. फक्त श्वासच काय तो चालू होता. सारे गड निशब्द झाले होते. वारादेखील थांबला असे वाटत होते. महाराजांच्या पादुका उरी कवटाळून सती जायचे आम्ही ठरवले.
सौभाग्याचं लेणं ल्यालं, भाळी मळवट भरलं, हाती हिरवा चुडा भरला, साऱयांचा निरोप घेऊन झाला. फक्त समोर मोठ्ठं आव्हान होतं ते शंभूराजांचा निरोप कसा घ्यायचा? पण तोही प्रश्न आमच्या बाळाने सोडवला. त्यांना ही वार्ता कळताच ते तडक गडावर पोहोचले. आम्हांस या वेशात बघताच धाय मोकलून रडले. आमच्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही बघताच त्यांनी आम्हाला जवळ घेतलं. पाठोपाठ शब्द आले, “छोटय़ा आईसाहेब, आम्ही आपणांस जाऊ देऊ असा विचार कसा करू शकता आपण! अहो आई काय असते हे कळण्यापूर्वीच आमचे मातृत्व हिरावले गेले, पण आपल्या रूपात आम्हाला ते पुन्हा गवसले. आता तेही हिरावलं गेलं तर आम्ही जगायचं तर कसं? आता आऊसाहेब नाहीत, आबासाहेब नाहीत.”
त्यांचे शब्द हृदयाला भिडत होते, पण नजर महाराजांकडे लागली होती. पुन्हा शब्द कानावर आले, “मला सांगा, आबासाहेबांचे प्रत्येक तत्त्व आपण जगलात…! मग सती कोणासही जाऊ देणार नाही हा त्यांचा आदेश कसा मोडता? सांगा मातोश्री सांगा?” आमची द्विधा मन:स्थिती झाली. कारण वेध पैलतीराचे लागले होते. महाराजांकडे डोळे लागले होते. हृदय तर केव्हाच महाराजांपर्यंत जाऊन पोहोचले होते, पण आमच्या पुत्राचे बोट मात्र सुटत नव्हते. महाराजांची तत्त्वं मोडण्याचे पाप घडू नये असेही वाटत होते. या पुतळेचा पेच ईश्वराने सोडवला. आमचे श्वास शंभू बाळाच्या मांडीवर शांत झाले. आम्हांस सतीच्या रूपात मरण आले. आमच्या जिवाचे सोने झाले. आम्हाला वांझ ठरवलं गेलं असलं तरी या पुतळाला पुत्रवती म्हणून मरण आलं. वाटत होतं महाराज आम्हांस खिजवत आहेत. म्हणत आहेत, बघा शेवटी शंभू तुमचाच झाला ना? आम्ही आमच्या ज्येष्ठ पुत्राची भेट न घेताच, त्याला डोळाभर न बघताच श्वास सोडला, पण तुम्ही मात्र पुत्राच्या मांडीवर शांत झालात. पुतळा, केवढं हे भाग्य! पण आता मात्र गडावर जीव गुंतवू नकोस. आपण आपल्या मायेच्या नजरेने स्वर्गातूनच साऱ्यांना बघू. आशीर्वादाचा हात सदैव त्यांच्या मागे ठेवू. ये पुतळा ये!… आणि ही पुतळा पोहोचली तिच्या महाराजांच्या पायाशी… कधीही दूर न होण्यासाठी.
(समाप्त)



























































