बदामराव पंडितांच्या पाऊलवाटेचा राष्ट्रीय महामार्ग झाला – जयदत्त क्षीरसागर

1560

गेवराई माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी गेवराई मतदारसंघांमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासोबतच विकासाची अनेक कामे केली आहेत. त्यामुळे जनता त्यांना कधीच विसरत नाही. बदामराव पंडित यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पाऊलवाट पडली होती, आता अनेकांचे प्रवेश शिवसेनेत होऊ लागल्याने त्याचा राष्ट्रीय महामार्ग झाला आहे. येणाऱ्या काळात सत्ता आपलीच असेल, असा विश्वास राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.

माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या डीपीडीसी योजनेअंतर्गत 2 कोटी 60 लाख रुपयांच्या जि प माध्यमिक शाळा धोंडराई या शाळेच्या इमारतीचे मंगळवारी झाले. त्याप्रसंगी क्षीरसागर बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी राज्यमंत्री बदामराव पंडित तर जि प शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख, अर्थ व बांधकाम सभापती युधाजित पंडित, पं स सभापती अभयसिंह पंडित, जि प सदस्य बप्पासाहेब तळेकर आदी यावेळी उपस्थित होते. शाळेसाठी जमीन दान दिलेल्या श्रीमती जानकाबाई दरक, केदारनाथ दरक व पंकज दरक यांचा क्षीरसागर व बदामराव पंडित यांनी सत्कार केला. क्षीरसागर म्हणाले की, 2 वर्षात जिल्ह्यात रेल्वे धावणार असून सामान्य माणसाच्या प्रगतीला बळकटी मिळणार आहे. सतत दुष्काळावर मात करण्यासाठी पाण्याचा प्रश्न कायमचा सोडायचा असून काळ्याआईची तहान भागवायची आहे. दुष्काळ हा भूतकाळ करायचा असेल तर मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळून घ्यावे लागेल. समुद्राला वाहून जाणारे 600 टीएमसी पाणी हे गोदावरी, मांजरा व सिंदफणाच्या पात्रात आणून सोडण्यासाठी सरकार काम करीत असून त्याला मंजुरीही मिळाली आहे. लवकरच वाटर ग्रीडचे काम होऊन त्याचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. प्रत्येकाने जंगल जपले पाहिजेत. पर्यावरणाचा समतोल सर्वांनी जबाबदारीने राखला पाहिजे, असे सांगून क्षीरसागर म्हणाले की, बदामराव पंडित यांनी मतदारसंघात लोकहिताची अनेक कामे केली आहेत. त्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी आहेत. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी त्यांचे कामही मोठे आहे. विद्यार्थ्यांनी संगणकीय शिक्षणावर भर द्यावा. आता गुणवत्ता हाच यशाचा मार्ग असून आरक्षणाच्या कुबड्या जास्त काळ टिकणार नाहीत. गुणवत्तेवर टिकेल तोच पुढे जाईल असेही ते म्हणाले.

बदामराव पंडित म्हणाले की, यापूर्वी मतदारसंघात विकास कामे करताना जयदत्त क्षीरसागर यांचे खूप सहकार्य लाभले आहे. विकासाचा हा भगीरथ अविरतपणे सुरूच राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राजेसाहेब देशमुख, अभयसिंह पंडित, पंढरीनाथ लगड, यांचीही यावेळी भाषणे झाली. ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या