जयसिंगपूरच्या उपनगरांत संचारबंदीचा बोजवारा, रस्तोरस्ती फिरताहेत बेजबाबदार नागरिक

जयसिंगपूर शहराच्या मुख्य भागात लॉकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असल्याचे चित्र असले, तरी शहराच्या उपनगरी भागांत संचारबंदीचा बोजवारा उडाला आहे. शाहूनगर, राजीव गांधीनगर, अवचितनगर, संभाजीनगर आदि उपनगरी भागांत नागरिक अत्यंत बेजबाबदारपणे रस्तोरस्ती फिरत आहेत.

शहराच्या मुख्य क्रांती चौक, गांधी चौक, रेल्वे स्टेशन, झेले चित्रमंदिर, नांदणी नाका, नांदणी रस्ता आदि ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. शहराबाहेरून येणार्‍या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. वाहनांतून लोक कशासाठी शहरात येत आहेत, त्यांचे खरेच शहरात काम आहे का, आदि चौकशी करूनच ही वाहने सोडण्यात येत आहेत. त्यामुळे विनाकारण शहरात येणार्‍या वाहनधारकांवर अंकुश बसला आहे.

सोशल डिस्टन्सिंगची ऐशी तैशी…
उपनगरी भागांतही दुकाने बंद आहेत. मात्र, घोळक्याने कट्ट्यावर बसून गप्पा मारणार्‍यांची संख्या या भागात मोठी आहे. ‘उकडतंय’, ‘करमत नाही’, ‘सारखा टीव्ही काय बघायचा?’, अशी विविध कारणे देत विशेषतः तरुणवर्ग चौकाचौकात जमत आहे. काही ठिकाणी गल्लीच्या कोपर्‍यांवर दुकानांचे फलक, सिमेंट पाईप्स टाकून रहदारी अडविली आहे आणि गल्लीतील लोक ग्रुपने कॅरम, पत्ते खेळण्यात दंग आहेत. त्यामुळे सोशल डिसन्स्टिंगची ‘ऐशी की तैशी’ झाली आहे. गल्ल्या बंद असल्याने पोलिसही तिकडे जाण्याची टाळाटाळ करीत आहेत. ‘लॉकडाऊन’ आहे, म्हणजे सुटीच आहे, या समजुतीतून ‘मॉर्निंग वॉक’ला जाणार्‍यांची संख्या वाढली आहे. सध्याचे दिवस मौजमजेचे नाहीत, हे या बेजबाबदार नागरिकांना कोण समजाविणार?

‘ब्लॅक’ मध्ये दारू, मावा….
गावातील पानटपर्‍या बंद असल्या, तरी तंबाखू, मावा सहज उपलब्ध होत आहेत. त्याच्या पिचकार्‍या मारत तरुण मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर जमून ‘कोरोना’च्या गप्पा मारीत आहेत. ‘ब्लॅक’ मध्ये तंबाखू, मावा, सिगारेट मिळत असल्याने दरात मनमानी वाढ करून विक्री केली जात आहे. याबरोबरच दारूची दुकाने बंद असल्याने चोरट्या पद्धतीने दारूच्या बाटल्यांची चढ्या दराने विक्री केली जात आहे. पोलिसांसह उत्पादन शुल्क खात्याने काही प्रमाणात कारवाई केली असली, तरी चोरटी विक्री सुरूच आहे.

मॉलसमोर पहाटेपासूनच गर्दी
सकाळी सहा ते नऊपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवल्याने दुकानांसह मॉलसमोर पहाटे पाचपासूनच नागरिक रांगा लावत आहेत. रिक्षा, टेम्पोसह अन्य वाहनांतून भाजीविक्रेते शहरातून फिरून विक्री करीत आहेत. नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात क्रमाक्रमाने जागोजागी जंतुनाशक द्रावणाची फवारणी करण्यात येत आहे. बँकांमध्येही अत्यंत तुरळक प्रमाणात लोक व्यवहारांसाठी जात आहेत. भाजीविक्रेत्यांना केवळ घरोघरी फिरून विक्री करण्याची परवानगी असल्याने लोकांनी मंडईत गर्दी केलेली नाही.

जयसिंगपुरात तिघांवर कारवाई
संचारबंदीच्या काळात रात्री विनाकारण दुचाकींवरून फिरणार्‍या बिरू तळेवाड (वय २५, रा. मादनाईक मळा), ओंकार सावंत (वय १९, रा. राजीव गांधी नगर) या दोघांवर जयसिंगपूर पोलिसांनी कारवाई केली. तर, होम क्वारंटाईनचा शिक्का असतानाही अबुबकर मुल्ला (वय ३८, रा. ५२ झोपडपट्टी) हा परिसरात फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने त्याच्यावरही पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

६२४ जण ‘होम क्वारंटाईन’मध्ये
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दानोळीसह परिसरातील सात गावांत परदेशातून,परराज्यातून व मोठ्या शहरांतून आलेल्या तब्बल ६२४ जणांना ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले. त्यांच्या हातांवर शिक्का मारून त्यांना घरीच राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. आशा सेविका व आरोग्यसेविका यांच्यामार्फत गावागावांतून सर्वेक्षण करण्यात येत आहे. दानोळी येथील १५२, कोथळी येथील १६६, निमशिरगाव येथील १०४, कवठेसार येथील ५१, उमळवाड येथील ६०, जैनापूर येथील ४८ व तमदलगे येथील ४३ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या