गुटख्याची 53 पोती चोरल्याच्या संशयावरून दानोळीत निर्घृण खून

947

गुटख्याची पोती चोरल्याच्या संशयावरून कर्नाटकातील ट्रक ड्रायव्हरसह तिघांना दानोळीत बेदम मारहाण करण्यात आली. आरोपींनी यातील एकाचा दानोळी (ता. शिरोळ) येथील फार्महाऊसवर खून करण्यात आला. त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मारहाण झालेल्याच एकाला दोन लाख रुपयांचे आमिष दाखविण्यात आले. मात्र, अंकली (जि. सांगली) टोलनाक्यावर मृतदेह घेऊन जाणारा कंटेनर पोलिसांना सापडल्यामुळे या खुनाचा उलगडा झाला. या खूनप्रकरणी कर्नाटक राज्यासह दानोळी, कोथळी, इचलकरंजी, मिरज येथील सुमारे दहाजणांचा समावेश असल्याचा संशय असून त्यापैकी सहा जणांना जयसिंगपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापैकी दानोळी येथील एकजण पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचा गँगस्टर भरत त्यागी याच्या खूनप्रकरणात समावेश आहे.

जयसिंगपूर विभागाचे पोलिस उपाधीक्षक किशोर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार,कर्नाटक राज्यातील तुमकूर औद्योगिक वसाहतीतून 18 जानेवारीला कंटेनरमधून 144 पोती गुटखा अथणीकडे घेऊन चांदपाशा सनाउल्ला (23) व नरसिंहमूर्ती (वय 27, दोघे रा. नीलमंगळा, जि. बेंगलोर) हे दोघे निघाले होते. अथणी येथे कंटेनर आल्यानंतर गुटख्याची सुमारे दहा लाख रुपयांची 53 पोती चोरीस गेल्याचे चालक चांदपाशा सनाउल्ला याच्या निदर्शनास आले. यानंतर त्याने कंटेनरचे मालक जुबेर अहमद शेख याला याची माहिती दिली. यानंतर 20 जानेवारी रोजी जुबेर शेख हा आपले साथीदार इम्रान अल्ताफ पाशा, अश्रफ अली उस्मान अली, साजिद पाटणी यांच्यासह अथणी येथे पोचला. ‘तुम्हीच चोरी केली’, असा संशय घेऊन या सर्वांनी चांदपाशा, नरसिंहमूर्ती यांना मारहाण केली. यानंतर त्यांना इनोव्हा कारमधून मिरज येथील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये आणून डांबून ठेवण्यात आले. या ठिकाणीही त्यांना हॉकी स्टिक, काठ्या व वायरने मारहाण करण्यात आली. नरसिंहमूर्ती व त्याचा मित्र अर्जुन यांचे फोनवर बोलणे झाल्याचे स्पष्ट झाल्याने अर्जुन यालाही संशयितांनी बोलावून घेतले. त्यालाही तेथे मारहाण केली. यानंतर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश ऊर्फ महादेव बजरंग दळवी याच्या दानोळी येथील फार्महाऊसवर तिघांना नेण्यात आले.

या ठिकाणी तिघांनाही पुन्हा अमानुष मारहाण करण्यात आली. लाल मिरचीचे पाणी प्यायला दिले. त्यांना इलेक्ट्रिक शॉक देण्यात आले. त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतण्यात आले. या बेदम मारहाणीत अर्जुन (वय 27, पूर्ण नाव माहीत नाही, रा. खटिरवा स्टुडिओ, ता. नंदिनी लेवेट, जि. बेंगलोर) याचा मृत्यू झाला.

अर्जुन याचा मृत्यू झाल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी संशयित आरोपींनी नरसिंहमूर्ती याला दोन लाख रुपयांचे आमिष दाखवून अर्जुनचा मृतदेह घेऊन जाण्यास सांगितले. अर्जुन यानेच गुटख्याची पोती चोरल्याने आपण त्यास मारले, असा जबाब पोलिसांत देण्यासाठी नरसिंहमूर्ती याच्यावर संशयितांनी दबाव टाकला. तसे न केल्यास त्याला जिवे मारण्याची धमकीही दिली.

दरम्यान, मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अंकली टोलनाक्याजवळ पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे, उपनिरीक्षक अजित पाटील, प्रमोद वाघ, सहायक फौजदार तानाजी गुरव यांच्या पथकास संबंधित कंटेनर निदर्शनास आला. कंटेनरची कसून तपासणी केली असता कंटेनरमध्ये मृतदेह आढळला. यानंतर खुनाच्या प्रकरणाचा उलगडा झाला.

या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी भरतेश सिद्राम कुडचे (34), रणजित प्रकाश मिसाळ (वय 32, दोघे रा. नदीवेस मिरज), जुबेर अहमद शेख (वय 32, रा. नीलमंगळा, जि. बेंगलोर), इम्रान अल्ताफ पाशा (वय 32, रा. चिकबानावारा, जि. बेंगलोर), अश्रफअली उस्मान अली (वय 38, रा. सतरंज पुरा, नागपूर), महंमद जुनैद अब्दुलगफार दिवाण (वय 43, रा. शांतिनगर, नागपूर) यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता सोमवार 3 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

आपली प्रतिक्रिया द्या