
देशातील आयआयटींमध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी घेण्यात आलेल्या जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत आयआयटी हैदराबाद विभागातील वाविलाला चिद्विलास रेड्डी या विद्यार्थ्याने 360 पैकी 341 गुण मिळवून देशात पहिला क्रमांक मिळवला आहे, तर नायाकांती नागा भाव्या श्री या विद्यार्थिनीने 360 पैकी 298 गुण मिळवत मुलींमधून पहिली येण्याचा मान मिळविला आहे. तिचा ऑल इंडिया रॅंक 56 असून तीदेखील आयआयटी हैदराबादची विद्यार्थिनी आहे. देशातील टॉप 10 टॉपर्समधील सहा विद्यार्थी हे तेलुगू भाषिक असून तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील आहेत.
देशभरातील आयआयटींमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी चुरस असते. जेईई मेन्सनंतर विद्यार्थ्यांचे लक्ष जेईई अॅडव्हान्स्डकडे असते. यंदा आयआयटी गुवाहाटीतर्फे जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा 1 लाख 80 हजार 272 परीक्षार्थ्यांनी दिली. त्यातील 43 हजार 773 परीक्षार्थी पात्र ठरले. त्यात 7 हजार 509 मुली आहेत. आयआयटी दिल्लीअंतर्गत 9 हजार 290, आयआयटी गुवाहाटीअंतर्गत 2 हजार 395, आयआयटी हैदराबादअंतर्गत 10 हजार 432, आयआयटी कानपूरअंतर्गत 4 हजार 582, आयआयटी खरगपूरअंतर्गत 4 हजार 618, आयआयटी रुरकीअंतर्गत 4 हजार 999 परीक्षार्थी पात्र ठरले आहेत.
आयआयटी मुंबईअंतर्गत 7 हजार 975 विद्यार्थी पात्र
आयआयटी मुंबईतून 31 हजार 788 विद्यार्थ्यांनी जेईई अॅडव्हान्स्डसाठी नोंदणी केली होती. त्यातील 29 हजार 758 विद्यार्थी परीक्षेला बसले. यातील 7 हजार 957 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. देशातील टॉप 10 विद्यार्थ्यांच्या यादीत आयआयटी मुंबईतील एकाही विद्यार्थ्याचा समावेश नसून टॉप 100 मध्ये मात्र 22 विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले आहे. आयआयटी मुंबई विभागातील पहिल्या पाच स्थानी उज्ज्वल शंकर (सीआरएल 11), युवराज गुप्ता (सीआरएल 13), चैतन्य माहेश्वरी (सीआरएल 15), जस्त्य जरीवाला (सीआरएल 24), सुमेध एस एस (सीआरएल 37) यांचा समावेश असून मुलींमध्ये आदिती सिंगने पहिला क्रमांक मिळवला आहे.




























































