‘जेईई’तील सर्वाधिक टॉपर्सनी निवडली आयआयटी मुंबई

जेईई-अॅडव्हान्स्ड परीक्षेतील देशातील ‘टॉप 100’मधील 61 विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणासाठी पवईच्या आयआयटी मुंबईची निवड केली आहे. 30 विद्यार्थ्यांनी आयआयटी दिल्लीला तर उर्वरित नऊपैकी सात जणांनी आयआयटी मद्रासला प्राधान्य दिले आहे. देशात पहिला आलेला चिराग फेलोर आणि चौथा आलेला महेंदर राज हे अमेरिकेत आपले पुढील शिक्षण घेणार आहेत.

प्रवेशाच्या पहिल्या टप्प्यात ‘टॉप 100’ विद्यार्थ्यांनी निवडलेले पर्याय पाहता यंदा खरगपूर आणि कानपूर आयआयटीची लोकप्रियता कमी झाल्याचे दिसून येते. तीस वर्षांपूर्वी आयआयटी खरगपूरमध्ये इंजिनीयरिंगसाठी प्रवेश मिळणे म्हणजे प्रतिष्ठेचे मानले जात होते. खरगपूर येथील आयआयटी संस्था ही देशातील सर्वात जुनी आयआयटी आहे. मात्र यंदा ‘टॉप 100’मधील एकाही विद्यार्थ्यांने खरगपूरची निवड केलेली नाही.

जेईई-अॅडव्हान्स्डमधील ‘टॉप 500’ किंवा ‘टॉप 1000’मधील विद्यार्थ्यांनी निवडलेले पर्याय पाहिले तर त्यातही मुंबई, दिल्ली आणि मद्रास येथील आयआयटी संस्थांनाच सर्वाधिक विद्यार्थ्यांनी प्राधान्य दिले आहे. टॉप 301 ते 400 आणि 401 ते 500 यामधील दोन विद्यार्थ्यांनी आयआयटीमध्ये मिळालेल्या जागा नाकारल्या आहेत.

आवडता अभ्यासक्रम न मिळाल्यास एनआयटी, आयआयआयटीला प्राधान्य

‘टॉप 1000’मधील नऊ विद्यार्थ्यांनी आयआयटी संस्थांमध्ये त्यांच्या आवडीच्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळाला नाही तर एनआयटी किंवा आयआयआयटी संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती देशातील या उच्च शिक्षण संस्थांमधील प्रवेशावर नियंत्रण ठेवणाऱया ‘जोसा’ प्राधिकरणाने दिली आहे. देशात 23 आयआयटी संस्था आहेत. त्यामध्ये सोळा हजार जागा आहेत. टॉपर्समधील काही जणांनी रुरकी, गुवाहाटी आणि हैदराबाद येथील आयआयटी संस्थांनाही प्राधान्य दिले आहे. आयआयटी हैदराबादने आर्टिफिशियल इंटेलिजन्स अॅण्ड मशीन लर्निंग हा अद्ययावत बी. टेक. अभ्यासक्रम सुरू केल्याने टॉपर्स तिथे आकर्षित झाल्याचे दिसून येते.

शिक्षणाचा दर्जा चांगला असल्याने जेईईतील टॉपर्स नेहमीच आयआयटी मुंबईला प्राधान्य देतात. आयआयटीतील शिक्षण, जागतिक ख्याती आणि संशोधनाच्या भरपूर संधी, यामुळे गेल्या आठ-दहा वर्षांत आयआयटी मुंबईत प्रवेश घेण्याकडे टॉपर्सचा कल वाढला आहे असे आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाशिष चौधरी म्हणतात.

आपली प्रतिक्रिया द्या