
सामना ऑनलाईन, मुंबई
आर्थिक अडचणींमुळे वैमानिकांसह अनेक विभागांतील कर्मचाऱ्यांचा गेले तीन महिने पगार न देणाऱ्या जेट एअरवेजवर आता विमान जप्तीची नामुष्की ओढवली आहे. देणी चुकवली नाहीत म्हणून नेदरलँडच्या ऍमस्टरडॅम विमानतळावर जेट एअरवेजचे बोईंग विमान जप्त केले. कार्गो सेवा देणाऱ्या कंपनीने ही कारवाई केली. विमान जप्त होण्याची जेटची ही पहिलीच वेळ आहे.
गेल्या 25 वर्षांपासून नागरी विमान वाहतूक सेवेत असलेली जेट एअरवेज आर्थिक संकटात सापडली आहे. मुंबईत जेटचे मुख्यालय आहे. पैसे नसल्यामुळे जेटची या आधीच बरीच उड्डाणे रद्द करण्यात आली असून 129 उड्डाणांवरून ही संख्या आता केवळ 32 वर पोहोचली आहेत.
मागच्या आठवडय़ात रक्कम थकवल्याप्रकरणी जेटच्या विमानांना बंद करण्यात आलेला इंधनपुरवठा सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन या तेल कंपनीने पूर्ववत केला आहे.
कर्ज पुनर्रचना योजने अंतर्गत एसबीआयच्या नेतृत्वाखाली बँकांचा समूह जेटचे व्यवस्थापन आपल्या हातात घेणार आहे.
एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाने बनवलेल्या योजनेला जेट एअरवेजच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली. त्या अंतर्गत जेटमध्ये 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आहे.
जेटचे संस्थापक नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नीने संचालक मंडळाचा नुकताच राजीनामा दिला आहे.
पगार थकवल्याप्रकरणी वैमानिकांनी बुधवारी कंपनीला नोटीस बजावली आहे.



























































