भिशी चालवणारे ज्वेलर्स पोलिसांच्या रडारवर, ठाणे-डोंबिवलीनंतर घाटकोपरमध्येही घपला

2966

भिशीच्या नावाखाली ग्राहकांकडून पैसे घ्यायचे आणि वर्षभरानंतर तेवढय़ाच पैशांचे सोन्याचे दागिने मिळतील असे आश्वासन द्यायचे ही योजना मुंबई आणि ठाण्यात चांगलीच फोफावली आहे. ठाणे-डोंबिवलीतील गुडवीन ज्वेलर्सने असे भिशीचे करोडो रुपये घेऊन पळ काढल्यानंतर आता घाटकोपरमध्येही रसिकलाल ज्वेलर्सने काहीजणांना चुना लावल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी आता अशी भिशी योजना चालवणाऱ्या सर्वच ज्वेलर्सकडे आपला मोर्चा वळवला आहे.

ठाण्याचा गुडवीन ज्वेलर्स पळाला आणि ठाण्यापासून डोंबिवलीपर्यंत एकच बोंब झाली. दुकानाच्या मालकाने व्हिडीओ व्हायरल केला. पोलिसांनी त्याच्या घरावर धाड टाकली. हे प्रकरण ताजे असतानाच घाटकोपर पूर्व येथील रसिकलाल संकलचंद ज्वेलर्सही कचाटय़ात सापडला. गेल्या आठवडय़ात दिवाळीदरम्यान रसिकलाल दिवाळखोरीत गेल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली आणि मग ग्राहकांची धावाधाव सुरू झाली. दुकानाचा मालक जयेश शहा याच्यावर विश्वास ठेवून अनेकांनी भिशी जमा केली होती. त्यात गुजराती समाजाच्या लोकांचा अधिक भरणा होता.

व्हॉटस्ऍपने घात केला
जयेश शहा याचा घात व्हॉटस्ऍपने केल्याचे उघड झाले आहे. रसिकलाल ज्वेलर्स दिवाळखोरीत गेला. 300 कोटींचा घोटाळा झाला. दुकान बंद झाले असे मेसेज फिरू लागल्याने ग्राहकांनी दुकानाबाहेर गर्दी केली. पीएमसी बँक प्रकरण, ठाण्याचा गुडवीन ज्वेलर्स घोटाळा अशी प्रकरणे ताजी असल्याने ग्राहकांनी रसिकलाल दुकानाबाहेर तोबा गर्दी केली होती.

मोडस ऑपरेंडी सारखीच
ज्वेलर्सनी भिशी चालवणे हा प्रकार सर्वत्र थोडय़ाफार फरकाने सारखाच आहे. महिन्याला ठरावीक रक्कम गोळा करायची आणि वर्षभरानंतर 12 महिन्यांचे ग्राहकांचे पैसे अधिक दुकानदाराचे एक महिन्याचे बोनस पैसे असे आमिष दाखवायचे आणि त्या एकूण पैशांचे दागिने घेऊन जा असे सांगायचे अशी ती मोडस ऑपरेंडी आहे. पोलिसांनी आता अशी भिशी योजना चालवणाऱया सर्व ज्वेलर्सकडे आपला मोर्चा वळवला आहे. मुंबई-ठाण्यात आणखीही काही प्रकरणे तपासात उघड होऊ शकतात अशी शक्यता एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाने व्यक्त केली.

गुन्हा दाखल
रसिकलालविरोधात आतापर्यंत सातजणांनी तक्रार दाखल केली असून जयेश शहावर गुन्हा दाखल झाला आहे. पंतनगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या