रिल्सच्या वादातून पतीचा गळा घोटला; मृतदेहाजवळ बसून श्रृंगार केला, दारू पिऊन नाचली अन्…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातून एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. सोशल मीडिया रील बनवण्यावरून झालेल्या वादातून एका पत्नीने आपल्या पतीची निर्घृण हत्या केली. धक्कादायक म्हणजे, पतीचा मृतदेह घरात पडलेला असताना आरोपी पत्नीने तिथेच बसून मेकअप केला आणि त्यानंतर बाहेर येऊन बिअर पित डान्स केला. या संतापजनक घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना थांदला पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नारेला गावात घडली. मृत कैलास (25) याचे लग्न जून 2025 मध्ये झाले होते. 28 जानेवारीच्या सकाळी घरात कैलासचा चुलत भाऊ बंटी याच्या लग्नाची धामधूम सुरू होती. जेव्हा कैलासची मोठी बहीण त्याला उठवण्यासाठी खोलीत गेली, तेव्हा वारंवार हाका मारूनही त्याने प्रतिसाद दिला नाही. पांघरूण हटवून पाहिल्यावर कैलासचा शरीर थंड पडल्याचे लक्षात आले आणि हत्येचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, पत्नीने दोरीने गळा आवळून कैलासची हत्या केली. रील बनवण्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. यानंतर पत्नीने टोकाचे पाऊल उचलले. पतीची हत्या केल्यानंतर आरोपीने ती दोरी लग्नासाठी आलेल्या नवीन कपाटात लपवून ठेवली होती. झाबुआ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पत्नी अल्पवयीन असून तिला ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणातील सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे हत्येनंतरचा आरोपीचा महिलेचे वर्तन. पतीचा मृतदेह समोर असतानाही तिने आरशासमोर उभे राहून साजश्रृंगार केला. साडी नेसण्यासाठी तिने आपल्या पुतणीची मदत घेतली. जेव्हा पुतणीने कैलासला उठवण्याबाबत विचारले, तेव्हा “त्यानेच तिला न उठवण्यास सांगितले असून तो वरातीत येणार नाही” असे खोटे उत्तर तिने दिले. पतीच्या मृत्यूचे कोणतेही दुःख चेहऱ्यावर न दाखवता ती सामान्यपणे वावरत होती.

घरातील वातावरण शोकमय असताना आरोपी पत्नी बाहेर मांडवात गेली, जिथे लग्नाची तयारी सुरू होती. तिथे तिने बिअर प्यायली आणि इतर पाहुण्यांसोबत डान्सही केला. या कृत्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.