
झारखंडमध्ये एका मुलीच्या धाडसाबाबत सर्वस्तरातून कौतुक होत आहे. या मुलीने आपल्या कुटुंबाच्या विरोधात जात नवरदेवाच्या घरी फोन करुन मी अल्पवयीन आहे आता मला आता लग्न करायचे नाहीय असा फोन करून लग्न करण्यास नकार दिला. तिच्या या निर्णयाने तिने अन्य मुलींसमोर आदर्शच घालून दिला आहे.
ही घटना कोडरमा जिल्ह्यातील डोमंच ब्लॉकच्या मधुबनची आहे. राधा असे या मुलीचे नाव असून ती 17 वर्षांची आहे. राधा मधुबनची रहिवासी असून तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. राधाला तीन बहिणी आणि दोन भाऊ आहेत. अशा परिस्थितीत राधाला चांगले स्थळ आल्याने घरच्यांनी तिला न विचारता लग्न ठरवले. यावर राधाने घरच्यांना लवकर लग्न करायचे नाही असे सांगितले, त्यांना बरेच समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीच तिचे ऐकायला तयार नव्हते.
राधा फार दु:खी झाली होती. मात्र तिला शिकायचे होते. अखेर तिने हिंमत एकवटून नवरदेवाच्या घरी फोन करून मी अल्पवयीन असल्याचे सांगितले. तसेच तिला बालविवाह करायचा नसून शिक्षण घेऊन शिक्षिका व्हायचे आहेस असे सांगून तिने लग्नाला नकार दिला. ही बातमी गावात पसरताच तिच्या हिमतीचे सगळ्यांनीच कौतुक केले आहे.
दरम्यान, कोडरमाचे उपायुक्त रमेश घोलप यांना याची माहिती मिळताच ते राधाच्या घरी पोहोचले. राधाने दाखवलेल्या धैर्याचे त्यांनी कौतुक केले. तिने अनेक अल्पवयीन मुलींसमोर आदर्श घालून दिला आहे त्याबाबत राधाला सन्मानपत्र, शाल आणि पुस्तक देऊन तिचा गौरव करण्यात आला.
आता बालविवाह रोखण्यासाठी प्रेरणा म्हणून राधा हिला जिल्ह्यातील ब्रँड अॅम्बेसेडरही बनविण्यात येणार आहे. याशिवाय राधा सुकन्या योजनेशीही जोडली गेली आहे, ज्यामुळे मुलींना लिहिण्या-वाचण्याची प्रेरणा मिळेल. उपायुक्त रमेश घोलप यांनी राधाचे हे कार्य अन्य मुलींसाठी प्रेरणादायक ठरणार असल्याचे सांगितले.





























































