तीन महिलांना नातेवाईकानेच विकलं, अनेकदा झाले बलात्कार! प्रवासी मजुरांसोबत पळून जात वाचवला जीव

2882

झारखंडमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना उघड झाली आहे. एका अल्पवयीन मुलीसह तीन महिलांना त्यांच्याच नातेवाईकाने अनेकदा विकल्याची तसंच त्यांच्यावर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. अखेर जीव वाचवण्यासाठी या तीन जणी प्रवासी मजुरांसह फिरत फिरत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या आणि या संतापजनक घटनेचा खुलासा झाला.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, पीडितांमधील एकीची शेजारी असलेल्या अनिता नावाच्या महिलेने तिच्या मुलीचं लग्न भरतपूर येथील माणसाशी लग्न करून देण्याचं वचन दिलं होतं. तिने तिच्या बहिणीचा नवरा हरदेव याच्यासह पीडितेच्या मुलीला भरतपूर येथे पाठवलं. तिथे हरदेव याने पीडितेच्या 22 वर्षीय मुलीला 53 वर्षांच्या नंदलाल यादव नावाच्या माणसाला दीड लाखांना विकलं. नंदलाल याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला आणि तिला कैद करून ठेवलं. पीडितेला पळून जायचं होतं, मात्र नंदलाल तिला मारहाण करत असे.

काही दिवसांनी तिला घ्यायला हरदेव पुन्हा आला आणि त्याने तिला स्वतःच्या घरी नेलं. तिथे तिच्यासह तिच्या लहान बहिणीवरही हरदेवच्या भावाने बलात्कार केला. हरदेव याची नजर त्याच्या सावत्र मुलाच्या बायकोवरही होती. तिलाही विकण्याचा त्याचा बेत होता. हे हेरून हरदेवच्या सावत्र मुलाने या दोन बहिणी आणि त्याच्या पत्नीला तिथून बाहेर पळून जायला मदत केली.

या तिघीजणी कशाबशा तिथून पळाल्या आणि प्रवासी मजुरांच्या जथ्थ्यात मिसळल्या. तीन दिवस प्रवासी मजुरांसोबत चालत त्यांनी आग्र्याला फतेहपूर सीक्री गाठलं आणि तेथील पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी त्वरित या प्रकरणाची दखल घेऊन पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या