
बॉलीवूड अभिनेत्री जिया खान हिच्या मृत्यूप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालय 28 एप्रिलला निकाल जाहीर करणाल आहे. जियाला तिचा प्रियकर सूरज पांचोलीने आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. न्यायालयाने गुरुवारी दोन्ही बाजूकडील अंतिम युक्तिवाद ऐकून घेतले आणि निकाल राखून ठेवला आहे. जियाचा मृत्यू होऊन जवळपास दहा वर्षे उलटल्यानंतर विशेष न्यायालय खटल्याचा निकाल देणार आहे.
मूळ अमेरिकेची नागरिक असलेली जिया ही जुहू येथील राहत्या घरी 3 जून 2013 रोजी मृतावस्थेत आढळली होती. अधिक तपासात जियाच्या घरी तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. त्याआधारे पोलिसांनी जियाचा प्रियकर सूरज पांचोलीला अटक केली होती. 2021 मध्ये विशेष सीबीआय न्यायालयाकडे हा खटला वर्ग केला गेला. या खटल्यातील मुख्य फिर्यादी साक्षीदार जियाची आई राबिया खान हिने हे प्रकरण आत्महत्येचे नसून हत्येचे आहे, असा दावा न्यायालयात केला होता.

























































