
गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या ट्विट प्रकरणात आसाममधील न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आज त्यांना एका नव्या प्रकरणात पुन्हा अटक करण्यात आली. ट्विट्स प्रकरणी न्यायालयाने काल जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता.
मेवाणी यांच्यावर आयपीसी कलमांतर्गत दुखापत करणे, प्राणघातक हल्ला करणे किंवा सरकारी कर्मचाऱ्यांना किंवा इतरांना त्यांचे कर्तव्य पार पाडण्यापासून अडथळा करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
आसामच्या कोक्राझार येथील स्थानिक भाजप नेत्याने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर मेवाणी यांना गुजरातच्या पालनपूर येथून आसाम पोलिसांच्या पथकाने गुरुवारी प्रथम अटक केली. मेवाणी – पंतप्रधान मोदींचे टीकाकार – यांनी त्यांच्या अटकेला ‘PMO (पंतप्रधान कार्यालय) कडून सूडाचे राजकारण’ म्हटले आहे.
‘हे भाजप आणि आरएसएसचे षड्यंत्र आहे. माझी प्रतिमा डागाळण्यासाठी त्यांनी हे केले. ते पद्धतशीरपणे हे करत आहेत. त्यांनी रोहित वेमुलासोबत हेच केले, चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत केले, आता ते मला लक्ष्य करत आहेत,’ असेही मेवाणी यांनी आज पत्रकारांना सांगितले.
मेवाणी यांच्यावर गुन्हेगारी कट रचणे, प्रार्थनास्थळाशी संबंधित गुन्हे, धार्मिक भावना भडकावणे आणि शांतता भंग करतील अशी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत.
भाजप नेते अरुप कुमार डे यांनी मेवाणींवर आरोप केला आहे. आपल्या तक्रारीत ते म्हणतात की, मेवाणी यांचे ट्विट ‘विशिष्ट समुदायातील लोकांना चिथावण्याचा प्रयत्न करत असल्याची शक्यता आहे”.
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अरुप कुमार डे म्हणाले की, ‘मेवाणी आपल्या पोस्टवरून लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पंतप्रधान मोदींबद्द ते नेहमीच नकारात्मक बोलतात”.
‘आम्ही भाग्यवान आहोत की मोदीजी आमचे पंतप्रधान आहेत आणि मेवाणी त्यांचे नाव नुकत्याच झालेल्या हिंसाचाराशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी पंतप्रधान मोदी जबाबदार आहेत का? ते म्हणतात गोडसे हे पंतप्रधान मोदींचे देव आहेत, त्याचा काय पुरावा आहे?’, असे सवाल डे यांनी केले.
काँग्रेसने आरोप केला आहे की – तक्रारीच्या 24 तासांच्या आत – ही अटक गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने करण्यात आली आहे, ज्या राज्यात 1995 पासून भाजपची सत्ता आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. ‘मोदीजी, तुम्ही यंत्रणेचा गैरवापर करून असंतोष चिरडण्याचा प्रयत्न करू शकता. पण तुम्ही सत्य कधीच लपवू शकत नाही,’ असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
बनासकांठामधील वडगाम मतदारसंघातील अपक्ष आमदार मेवाणी यांनी पुढील निवडणूक काँग्रेस उमेदवार म्हणून लढणार असल्याचे सांगितले होते.
काँग्रेसच्या लीगल सेलचे प्रमुख आणि मेवाणी यांची बाजू मांडणाऱ्या टीमचा एक भाग असलेले मनोज भगवती यांनीही बारपेटा येथे आणखी एक गुन्हा दाखल झाल्याची माहिती असल्याचे सांगितले होते. ‘त्याची सुटका होण्याची शक्यता नाही,’ असेही भगवती म्हणाले.



























































