कोर्टच म्हणालं माझ्या विरोधात खटलाच उभा राहू शकत नाही! मेवाणींचा भाजपवर कट रचल्याचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसाम पोलिसांनी अटक केल्यानंतर गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांचे नाव पुन्हा चर्चेत आले. जामीनावर सुटका झाल्यानंतर मेवाणी यांनी आता केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यावर हल्लाप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर जिग्नेश मेवाणी हे तुरुंगातून बाहेर आले आहेत. यानंतर भाजपवर निशाणा साधत जिग्नेश म्हणाले की, ‘पीएमओमध्ये बसलेल्या काही भक्तांनी माझ्यावर एफआयआर दाखल केला आहे. हा आहे 56 इंचाचा भ्याडपणा, हा आहे 56 इंचाचा मुर्खपणा. ज्याचा वापर करून अधिकाऱ्यांनी माझ्यावर एका महिलेकडून खोटा गुन्हा नोंदवला.’

मेवाणी पत्रकार परिषदेत म्हणाले की, ‘गुजरातमध्ये पेपरफुटी, मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेले अंमलीपदार्थ इत्यादी प्रकरणांची चौकशी झाली नाही. एका महिलेने भाजपच्या मंत्र्यावर बलात्काराचा आरोप केला पण एफआयआर नोंदवण्यात आला नाही. पण माझ्या एका ट्विटने माझ्यावर एफआयआर आणि अटक – हा काय प्रकार आहे? गोडसेचे भक्त म्हटल्याने झोंबत असेल तर लाल किल्ल्यावर चढून एकदा गोडसे मुर्दाबादचा नारा लावा.’

आपले म्हणणे मांडताना जिग्नेश म्हणाले की,’कोर्टाने सांगितले की, माझ्यावर कोणताही खटला बनू शकत नाही.’ ट्विट करून मी कोणता गुन्हा केला असा सवालही त्यांनी यावेळी केला. ‘मग एका महिलेला पुढे करून दुसरी एफआयआर करण्यात आली. माझ्या ट्विटमध्येही मी फक्त शांतता प्रस्थापित करण्याबद्दल बोललो. पण जे झाले ते सर्वांना माहितच आहे’, असेही ते म्हणाले.

गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना आसाममधील बारपेटा जिल्ह्यात एका पोलीस कर्मचाऱ्यावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी कोर्टातून जामीन मिळाला आहे. त्यानंतर त्यांच्यावर एका महिला पोलिसाचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. नंतर या प्रकरणातही मेवाणी यांना कोर्टातून जामीन मिळाला होता. आता या प्रकरणी आपली बाजू मांडत जिग्नेश यांनी आपल्या विरोधात कट रचण्यात आल्याचे सांगितलं.