जिंतूर वझर येथे वाळू तस्करांचा धूमाकूळ

3
sand-mafia
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी। जिंतूर

प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. तालुक्यातील वझर येथील पूर्णा नदीपात्रातील वाळूचा लिलाव झालेला नसतानाही मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात आहे.

वाळू चोरट्यांनी निवडणुकीचा फायदा घेऊन लाखो रुपयांच्या वाळुचा अवैध उपसा केला. जिंतूर, परतूर, मंठा या तालुक्यातील वाहने मोठ्या प्रमाणावर दिसू लागली. पूर्णा नदीपात्राच्या वाळूचा लिलाव झाला नसतानाही ज्या ठिकाणचा लिलाव झाला आहे. त्या ठिकाणच्या पावत्या वापरून वझरमधील काही वाळूचोर पूर्णा नदीतून बेकायदेशीर वाळू उपसा करीत आहेत.

महसूल प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची यास छुपी साथ असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, मोठ्या प्रमाणावर वाळू मिळत असल्याने अचानक एवढी वाळू येते कोठून आली? असा प्रश्नही पडत आहे. तालुक्यातील डिग्रस, पाचलेगाव, येसेगाव यासह अनेक भागांतून वाळू उपसा होत आहे. प्रशासनाचे याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. तालुक्यातील वाळू घाटांचा लिलाव झाला नाही. मात्र वझर भागातीलच पूर्णा नदीच्या देवठाणा येथील वाळूघाटाचा लिलाव झाला आहे. त्यामुळे या ठिकाणच्या पावत्या वापरून नदीतील अन्य ठिकाणावरून वाळू उपसा केला जात आहे. ही बाब महसूल प्रशासनाला माहीत असतानाही कारवाई होत नसल्याने नदीकाठावरील गावांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. महसूल प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, वझर परिसरातील देवठाणा पॉईंट भागातील वाळू ठेका निघाल्याने वाळूचे भाव गडगडले आहेत. 26 हजार रुपयांना 4 ब्रास मिळणारी वाळू आता 16 हजार रुपयांना मिळत आहे. एका वाळू घाटातून किती वाळू उपसा होतो, याकडे लक्ष देण्यास महसूल प्रशासनाला वेळ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. जिंतूर तालुक्यातील वझर व परिसरातील पूर्णा नदीपात्रातून रात्रंदिवस बेसुमार वाळुचा उपसा होत आहे. या वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी पथक निघाले असता वाळूमाफियांनी ठिक ठिकाणी आपली माणसे बसविली आहेत. या माणसांद्वारे माहिती मिळताच हे वाळूमाफिया प्रशासनाचे पथक येईपर्यंत गायब होतात. त्यामुळे प्रशासनाच्या हाती काहीच लागत नाही. जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे. वाळू घाटांचा लिलाव झाल्यानंतर रात्रीच्या वेळी वाळू उपसा करता येत नाही. परंतु, वझर भागामध्ये रात्री 7 ते सकाळी 6 यावेळेत हजारो ब्रास वाळुचा उपसा होतो. विशेष म्हणजे जेसीबीच्या सहाय्याने हा वाळू उपसा होत असल्याने महसूल प्रशासनाला लाखो रुपयांचा चुना लागत आहे. त्यातच वाळू लिलाव झालेली एक पावती फाडून तिचा अनेक ठिकाणी वापर केला जातो. वाळूमाफिया रात्री-अपरात्री वाळू उपसा करीत आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

पोलिसांचे आर्थिक संबंध

महसूल उपविभागाचे अधिकारी उमाकांत पारधी यांनी पोलिसांचे वाळू माफियाशी आर्थिक हितसंबंध असल्याचे मोबाइल रेकॉर्डींग जप्त करून जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठविला होता. असे असताना पोलीस वाळूमाफीयांशी आर्थिक हितसंबंध जोपासून अवैध वाळू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे.