…त्यामुळे आता माझ्या जीवनाची शाश्वतीच नाही, जितेंद्र आव्हाडांच्या विधानामुळे खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या विधानांमुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्यासह कुटुंबावर हल्ला करण्याचा कट रचला जातोय असे म्हणत खळबळ उडवून दिली होती. आता त्यांनी पुन्हा एकदा माझ्या जीवनाची शाश्वतीच नाही असे विधान केले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ठाण्यातील वाढत्या गुंडगिरीवरून जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळामध्ये ठाण्यात अनधिकृत इमारतींच्या बांधकामाचे पिक आले असून बेकायदेशीर इमारतीमध्ये 10 टक्के भागिदारी प्रमुख गुन्हेगारांना दिली जातेय. हे काम करण्यासाठी त्यांनी महानगरपालिकेत एक माणूस बसवलाय. तो हे सगळे सांभाळतोय. सध्या ठाण्यात 200-300 अनधिकृत इमारती बांधल्या जाताहेत, असा आरोप आव्हाड यांनी केला.

संजीव जैसवाल यांच्या काळात एक अनधिकृत इमारत बांधली जात नव्हती. मग अचानक प्रशासनात असा काय बदल झाला की अनधिकृत इमारतींचे पीक आले आहे, असा सवालही आव्हाड यांनी केला. तसेच यामधून गुंडगिरी फोफावत असून गुंडांचे आर्थिक सक्षमीकरण होतेय. मुंबईत एकेकाळी जे गँगवार झाले ते रिअल इस्टेटवरूनच झाले होते. ठाण्यातही 5-6 खून झाले आहेत. हे खून एखाद्या प्रकल्पात दगड, माती, विटा कोणी टाकायच्या यावरून झाल्याचे आव्हाड यांनी म्हटले.

ठाण्यात एकूणच परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. ठाण्यात पाहिजे तो बंदुका काढतो, गोळ्या झाडतो आणि आणि त्याची तक्रारही घेतली जात नाही. पंढरी फडके नावाच्या प्रकरणामध्ये 20 जणांना आरोपी करण्यात आले, मोक्का लावला गेला. समोरच्या दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. यानंतर पंढरी फडकेला अटक केले. मात्र, फडकेच्या समोरच्या बाजूच्या लोकांवर गुन्हा नोंदवायला गेले तेव्हा पोलीस म्हणाले नोंदवणार नाही. ही कुठली पद्धत आहे मला कळत नाही, असेही ते म्हणाले.

मी अनुभवच घेतला आहे. नशिबाने माझ्याबाबत जेव्हा जेव्हा न्यायालयाने भूमिका घेतली तेव्हा सांगितले की ही केसच नाही. न्यायालयाने अक्षरशः नोंदवून ठेवले आहे. यानंतर आणखी वाईट परिस्थिती निर्माण होईल. माझ्यासारखा माणूस या सर्व गोष्टींना उघडपणे विरोध करतो. त्यामुळे आता माझ्या जीवनाची शाश्वतीच नाही असे आव्हाड यांनी म्हटले.

विधानसभेत मांडला मुद्दा

ठाण्यातील कायदा सुव्यवस्थेचे बारा वाजलेले आहेत. नको त्यांना बंदुकीचे परवाने मिळत आहेत. ठाण्यात मुंबईचे सर्व उच्चांक तोडले आहेत. ठाण्यातले बार सहा सहा वाजेपर्यंत सुरू असतात. येऊरमध्ये जंगल आहे. तिथे हॉटेल बार उघडण्याला परवानगी नाही. असं असतानाही तिथे सहा सहा वाजेपर्यंत दारू पाजली जाते. त्यातून प्रचंड गुंडगिरी वाढली आहे. गुंडांना पोलिसांनी लायसन्स दिलेले आहे. ठाण्यातल्या कायदा व सुव्यवस्थेबाबात काहीतरी गांभिर्याने घेतले पाहिजे, असे जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत सांगितले.