
कोरोनाशी लढाई सुरूच आहे. या लढाईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कुटुंबप्रमुखाप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेची काळजी घेत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सोबत आता आले आहेत जे. जे. अप्लाईड आर्टस्मधील त्यांचे वर्गमित्र, आजी-माजी विद्यार्थी. एकीकडे डॉक्टर्स, आरोग्यसेवक, पोलीस आपापल्या परीने या लढाईत उतरलेले असताना प्रसिद्ध डिझाईन तज्ञ भूपाल रामनाथकर यांच्या संकल्पनेतून ‘जे.जे.’तील कुंचलाही आता शस्त्र बनला आहे आणि ‘घरी राहा, सुरक्षित राहा’ असा संदेश विविध चित्ररूपांच्या माध्यमातून राज्यभरात व्हायरल होत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाविरुद्ध लढाईत सहभागी व्हा असे आवाहन केले. त्यानंतर प्रसिद्ध डिझाईन तज्ञ भूपाल रामनाथकर यांनी जे. जे.तील आजी-माजी विद्यार्थ्यांना आवाहन केले आणि ‘कोरोनाशी युद्ध’ ही मोहीम सुरू केली. रामनाथकर यांनी एक लोगो तयार केला आणि त्यावर आधारित पोस्टर तयार करण्यास विद्यार्थ्यांना सांगितले. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि तब्बल 2 हजार पोस्टर्स तयार झाली. या पोस्टर्समधील काही निवडक नंतर सोशल मिडियावर प्रसिद्ध करण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जे. जे.चे माजी विद्यार्थी. म्हणूनच या लढाईत आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आम्हा कलाकार मंडळींचा हा खारीचा वाटा आहे. महाराष्ट्रातील जतनेला कलेच्या माध्यमातून सजग करणे या हेतूपोटीच पोस्टर्सची निर्मिती केल्याचे रामनाथकर यांनी सांगितले.
आशेचा रंग पिवळा
कोरोनाविरुद्धची लढाई जिंकणे कठीण असले तरी अशक्य नाही. ही लढाई महाराष्ट्र जिंकणारच आहे. म्हणूनच सर्व पोस्टर्स ही पिवळय़ा रंगाच्या पार्श्वभूमीवर रेखाटण्यात आली आहेत. कारण पिवळा रंग हा आशादायक रंग मानला जातो. कोरोनाची गंभीरता लक्षात आणून देणारे तसेच घरी राहा, सुरक्षित राहा याची जाणीव करून देणारे संदेश जे. जे.तील विद्यार्थ्यांनी कलात्कमरीत्या साकारले आहेत आणि त्याचे राज्यभरात कौतुक होत आहे.




























































