जम्मू-कश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर, 900 जण अजूनही ताब्यात

880

जम्मू-कश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर आली असून कलम 370 हटवल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या 4000 नागरिकांपैकी 3100 जणांना सोडण्यात आले आहे. तर 900 जणांना अद्याप सोडण्यात आलेले नाही. अशी माहिती जम्मू-कश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी दिली आहे.

केंद्र सरकारने जम्मू-कश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम हटवल्यानंतर कश्मीरमध्ये हिंसाचार होण्याची दाट शक्यता होती. या पार्श्वभूमीवर जम्मू-कश्मीरमध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. तसेच अनेक ठिकाणी मोबाईल, फोन व इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. तर काही ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली होती. तसेच काही समाजकंटकाची धरपकडही करण्यात आली होती. या अंतर्गत जम्मू-कश्मीरमधील तब्बल 4000 लोकांना ताब्यात घेण्यात आले होते. पण आता येथील जनजीवन पूर्वपदावर आल्याने 4000 नागरिकांपैकी 3100 जणांना सोडण्यात आले आहे. तर 900 जण अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहेत. सिंह यांनी शुक्रवारी एका इंग्रजी वर्मानपत्राला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे.

370 कलम हटवल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये  कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जवानांवर दगडफेक करण्याच्या घटनांमध्ये सामील असणाऱ्या स्थानिकांना ताब्यात घेण्यात आले होते. या सर्वांचे त्यांच्या कुटुंबीयांसमोरच समुपदेशनही करण्यात आले. त्यानंतर पुन्हा असे कृत्य करणार नाही, या अटीवर त्यांना सोडण्यात आल्याचे सिंह यांनी यावेळी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या