
कोरोनामुळे प्राण गमावलेल्या डॉक्टरांना शहीदांचा दर्जा द्या, तसेच त्यांच्या पत्नी आणि मुलांना शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी नोकरी द्या, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिण्यात आले आहे. कोरोनाबळींमध्ये विशिष्ट घटकांचा विचार केल्यास डॉक्टरांचे सर्वाधिक बळी गेले आहेत. मात्र केंद्र सरकारने अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही, असा आरोपही पत्रात करण्यात आला आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, देशात 87 हजार आरोग्य सेवकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 573 जणांना प्राण गमवावा लागला आहे. तथापि केंद्र सरकारने ही आकडेवारी अधिकृतरित्या जाहीर केलेली नाही. केवळ आमच्याकडील आकडेवारी विचारात घेतली तर कोरोनामुळे 307 डॉक्टरांचा मृत्यू आणि 2006 जणांना विषाणूची लागण झाल्याची नोंद आहे. यातील 188 डॉक्टर हे जनरल प्रॅक्टीशनर असून त्यांचा कोरोनाग्रस्तांशी थेट संपर्क आल्याने मृत्यू झाला. डॉक्टर कोरोना महामारीत घरात राहून स्वतःला सुरक्षित ठेवू शकले असते, मात्र त्यांनी देशसेवेचा पर्याय निवडला. या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्राची सर्वोत्तम परंपरा जपली, असे असोसिएशनने म्हटले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरकारने डॉक्टरांच्या कार्याचा, त्यांच्या बलिदानाचा योग्य सन्मान ठेवला पाहिजे, अशी मागणी असोसिएशनने पंतप्रधानांकडे केली आहे.

























































